पिंपरी चिंचवड : शाहीर योगेश हे आधुनिक काळातील तपस्वी होते, असे मत गुरुवर्य भाऊ उपाख्य डॉ.वा.ना.अभ्यंकर यांनी निगडी येथे व्यक्त केले. निगडी येथे मनोहर सभागृहात महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित आणि संजीवनी महिला शाहिरी पथक संयोजित सातव्या स्वर्गीय शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार 2018 हा सांगली येथील शाहिरा अनिता खरात – ऐवळे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर अध्यक्षस्थानी होते. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड) शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, शिवसेना पिंपरी विधानसभा महिला संघटिका सरीता साने, शाहीर योगेश यांच्या पत्नी उषा भिष्णुरकर, शाहीर हेमंत मावळे, शाहीर बाळासाहेब काळजे, ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते. रुपये अकरा हजार रोख मानधन, प्रवास खर्च, स्मृतिचिन्ह, मानाचा शाहिरी फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ.वा.ना.अभ्यंकर पुढे म्हणाले, लोकांच्या मनातील धर्मप्रेरणा आणि राष्ट्रप्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी शाहीर योगेश यांनी एखाद्या तपस्व्याप्रमाणे शाहिरीच्या माध्यमातून आयुष्यभर योगदान दिले. शाहीर योगेश यांच्या गीतापासून राममंदिर चळवळीला खर्या अर्थाने बळकटी आली. त्यांच्या शाहिरीमुळे महाराष्ट्रातील असंख्य युवक – युवतींना प्रेरणा मिळाली. शाहीर योगेश यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा शाहिरा अनिता खरात – ऐवळे यांचा मोठा भाग्य योग आहे. यावेळी प्रतिवर्षी मोठ्या संख्येने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळाला भेट देणार्या रणरागिणी महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच इतिहास संवर्धनासाठी विशेष योगदान देणार्या संतोष गोलांडे आणि श्रमिक गोजमगुंडे यांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्रदान सोहळ्यापूर्वी मंगल थिएटर्सनिर्मित ’संगीत होनाजी – बाळा’ या एक अंकी नाट्यकृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील ’सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’,’लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखर्याचं’, ’घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला’ अशा भूपाळी, लावणी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहिरा अनिता खरात – ऐवळे यांनी आपल्या खणखणीत आवाजात शाहिरी कलेचे सादरीकरण केले. गणेशस्तवन, झाशीच्या राणीचा पोवाडा, शाहीर योगेश यांचा गौरव करणारे कवन आणि स्त्री भ्रूण हत्याविरोधी जागृतीगीत यामुळे रसिकांना स्फूर्ती प्रदान करीत अंतर्मुख केले. वनिता मोहिते, प्रचिती भिष्णुरकर, कांचन जोशी , स्मिता बांदिवडेकर, प्रताप रोकडे, प्रदीप गांधलीकर, राजेंद्र आहेर यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. शाहीर प्रकाश ढवळे यांनी प्रास्ताविक केले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश ढवळे यांनी आभार मानले.