जळगाव । शाहुनगरातील इंदिरानगरात राहणारे शेख कुटूंबिय शनिवारी मध्यरात्री झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी उघडून घरात प्रवेश करत तीन मोबाईल व साडेसात हजारांची रोकड असा एकूण वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शेख करीम शेख रशीद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडी उघडून घरात प्रवेश : शाहुनगरातील इंदिरानगरात शेख करीम शेख रशिद (वय-32) हे कुटूंबियांसोबत राहतात. तर बांधकाम मिस्तरी म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी शेख करीम, शेख तौफिक, शेख आसिफ हे तिघे भावंड मिस्तरी काम आटोपून घरी आले. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यांना मजूरी मिळाली होती. त्यामुळे तिघांकडे मजूरीचे पैसे होते. रात्री जेवन झाल्यानंतर तिघे भाऊ व आई तसेच करीम यांच्या पत्नी झोपून गेले. परंतू करीम यांचा लहान भाऊ आसिफ याला सुरत येथे जायचे असल्याने तो मध्यरात्री 1 वाजता उठून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी घरातून निघून गेला. करीम हा देखील जागा असल्याने भाऊ गेल्यानंतर त्याने घराच्या दरवाज्याची आतील कडी लावली झोपून गेला. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उघडून घरात प्रवेश केल्यानंतर दरवाज्याजवळ ठेवलेले तिन्ही भावांचे मोबाईल तसेच त्यांच्या पॅन्टच्या खिशातील रोकड असा 20 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दरवाज्यात पॅन्ट फेकल्या
रविवारी पहाटे 5 वाजता कामाला जाण्यासाठी करीम हा उठल्यानंतर त्याला तिघा भावांच्या पॅन्ट ह्या घराच्या दरवाज्यात फेकलेल्या दिसून आल्या. तिन्ही पॅन्ट उचलून तपासल्या असता शनिवारी मिळालेल्या पगाराचे पैसे त्यात मिळून आले नाही. तर दरवाज्याजवळ चार्जिंगला लावलेले मोबाईल देखील दिसून आले नाही. करीम यांनी कुटूंबियांना आवाज देवून उठवून त्याला मोबाईल व पैस्यांबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्याबाबत माहित नसल्याचे सांगितले. अखेर करीम शेख यांनी पैसे व मोबाईल न मिळून आल्याने घरात चोरी झाल्याची खात्री झाली. सकाळीच त्यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत घडलेल्या घटनेची हकीकत सांगताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र परदेशी करीत आहेत.