शाह-जादानंतर ‘शौर्य’गाथा!

0

नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीचे प्रकरण गाजत असताना आता काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा शौर्य यास लक्ष्य केले आहे. द वायर या न्यूज पोर्टलचा हवाला देत काँग्रेसने शनिवारी डोवाल यांच्यावर निशाणा साधला. डोवाल यांचा मुलगा ज्या संस्थेचा प्रमुख आहे त्या संस्थेत अनेक केंद्रीय मंत्री आहेत. तसेच शौर्य याच्या आर्थिक सल्लागार कंपनीत चार केंद्रीय मंत्री भागीदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे की, शाह-जादाच्या प्रचंड यशानंतर भाजपाकडून आता अजित शौर्य-गाथा समोर आली आहे.

जेमिनी कंपनीत चार मंत्री
काँग्रेसने अजित डोवाल यांच्या मुलावर द वायरच्या वृत्ताचा आधार घेत आरोप केला आहे की, डोवाल यांचा मुलाच्या इंडिया फाऊंडेशन या संस्थेला देश-परदेशातील कंपन्यांकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यापैकी अनेक कंपन्यांचे सरकारशीही व्यवहार आहेत. या संस्थेत काही केंद्रीय मंत्रीदेखील असून शौर्य डोवाल यांच्या जेमिनी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीतही काहीजण भागीदार आहेत. ही कंपनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकीसंदर्भातील कामे करते.

मोदी कारवाई करणार का?
शौर्य अजित डोवाल यांच्या कंपनीचाही 2014 नंतर विकास झाला आहे. या कंपनीत भागीदार असलेल्या चार केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निलंबित करावे, अशी मागणी काँगे्रसने केली आहे. तसेच सीबीआय चौकशीचीही मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात एका वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सांगितले की, मोदी या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता कधी दाखवतात हेच आम्हाला बघायचे आहे.