शिंदखेडा (प्रा.अजय बोरदे)। शेतकर्यांसाठी देशभर वेगवेगळी आंदोलने, यात्रा निघत असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी अधिकार्यांच्या पदरिक्ततेमुळे शेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. शिंदखेड्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पाच जागांसह तालुक्यातील चार कृषी मंडळामध्ये 21 जागा रिक्त आहेत. यात मंडळ कृषी अधिकार्यांच्या 4 पैकी 3 जागांचा तर कृषी सहाय्यकांचा 10 जागांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ह्या जागा रिक्त असल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासुन वंचीत राहत आहेत. एकूण 84 पदांपैकी 63 पदेश भरलेली असून 21 पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण 84 पदांपैकी 21 पदे रिक्त असल्यामुळे आता खरिप हंगाम आहे. मात्र कृषी विभाग सलाईनवर असल्याचे चित्र आहे.
अशी आहेत रिक्त पदे
तालुका कृषी कार्यालय – 16 विविध पदे, 5 पदे रिक्त आहेत, सहाय्यक अधिकक्षक 1, लिपीक 3, शिपाई 1, शिंदखेडा मंडळ – 17 पदे मंजूर, रिक्त पदे 4, मंडळ कृषी अधिकारी 1, कृषी पर्यवेक्षक 2,अनुरेखक 1, नरडाणा मंडळ – 17 जागापैकी मंडळ कृषी अधिकार्याचे 1 पद रिक्त, चिमठाणे मंडळ – 7 पदे रिक्त, कृषी सहाय्यक 5, अनुरेखक 1, शिपाई 1, दोंडाईचा मंडळ – 4 पदे रिक्त, मंडळ कृषी अधिकारी 1, कृषी सहाय्यक 3
शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंग
तालुक्यात मंडळ कृषी अधिकार्यांची 4 पदे असून शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा येथील पदे रिक्त आहेत. फक्त चिमठाणे मंडळातील पद भरले आहे. तालुका कृषी कार्यालयात असलेले एकमेव सहाय्यक अधिक्षकांचे पद देखील रिक्त आहे. तसेच लिपिक पदाच्या 4 जागा मंजूर असून 3 पदे रिक्त आहेत.शेतकर्यांसाठी शासनाने आणलेल्या नवीन योजनांची माहिती पोहचविण्याचे महत्वाचे काम असलेल्या कृषी सहाय्यकांच्या 49 पदांपैकी 10 पदे रिक्त आहेत, त्यामुळे शासनाच्या कृषी योजनांची माहिती शेतकर्यांपर्यत पोहचत नाही. शेतकर्यांना शास्वत शेतीकडे नेण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंग लागल्याची स्थिती तालुक्यात झालेली आहे. शेतकरी अनेक योजनांबाबात अनभिज्ञ आहेत. शासनाकडून नोकर भरती बंद असल्याचा फटका कृषी कार्यालयाला बसत
आहे.
84 जागांना शासनाची मंजूरी
शिंदखेडा तालुका दुष्काळी असल्यामुळे येथील शेतकरी दृष्काळाशी नेहमी संघर्ष करीत आहे. या परिस्थितीत येथील कृषी विभाग मात्र सलाईनवर आहे. शेतकर्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी तालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह चार कृषी मंडळाची निर्मीती करण्यात आली आहे. यात शिंदखेडा, नरडाणा, चिमठाणे, दोंडाईचा या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात एकुण 84 जागांना शासनाची मंजूरी आहे. तालुका कार्यालयातील 16 व शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा, चिमठाणे मंडळातील प्रत्येकी 17 जागांची आवश्यकता आहे. मात्र यापैकी तालुका कृषी कार्यालयात 5, शिंदखेडा मंडळात 4, नरडाणा 1, चिमठाणे 7, दोंडाईचा 4 अश्या 21 जागा रिक्त आहेत. सर्वाधिक जागा चिमठाणे मंडळात रिक्त असल्याने शेतकर्यांना शासनाच्या योजनेपासुन वंचीत राहवे लागत आहे.