शिंदखेडा । येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी मतदानासाठी प्रारंभ झाला. चौरंगी, पंचरंगी लढतींमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसत असून सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत 29 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा नगराध्यक्ष पदाची थेट लोकांकडून निवड होत आहे. या पदासाठी चौरंगी लढत होत असून मोठ्या प्रमाणात चुरस पहावयास मिळत आहे. नगरसेवक पदाच्या 17 जागा असून तीन जागांकरीता तिरंगी तर उर्वरीत 14 जागांकरीता चौरंगी, पंचरंगी लढती होत असल्याने त्यासाठीही राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजपर्यंत 18.50 टक्के मतदान झाले. दुपारी 12 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का 29 पर्यंत वाढला होता. शहरातील 27 केंद्रांवर सकाळी 7.30 वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासून केंद्रांवर गर्दी झाल्याने मोठ्या रांगा लागल्याचे चित्र बहुतांश मतदान केंद्रांवर दिसत आहे. निवडणूक आयोग व प्रशासन यांनी मिळून मतदारांसाठी अनेक सोयीसुविधा केल्या आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा न येता ती सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या आवारासह परिसरात चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.