शिंदखेडा नगरपालिकेत दुसर्‍या सर्वसाधारण सभेत विरोधकांचा सभात्याग

0

धुळे । न.प.च्या दुसर्‍या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर मागील सभेचे इतिवृत्त व यासंदर्भातला विषय नसल्याने विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. नगर पंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. यात एकूण 19 विषय घेण्यात आले होते. या सभेतील विषयांना मंजुरी दिली किंवा नाही तसेच प्रोसिडीग बुकात त्याची नोंद करण्यात आली असल्यास त्यासंबंधी छायांकित व साक्षांकीत प्रति देण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांच्या संमतीने मंजूर करण्यात आला होता. मात्र आज 9 मार्च रोजी बोलविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर वरील कोणतेही विषय घेण्यात आले नाही व प्रतिही देण्यात आले नाहीत. यामुळे विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. यानंतर तात्काळ विरोधी पक्षाचे गटनेते व माजी सभापती प्रा. सुरेश देसले यांच्या निवासस्थनी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक सुनील चौधरी, दीपक अहिरे, उदय देसले, संगीता थोरात, संगीता भिल, मीरा पाटील, सुरज देसले, इंद्रिस कुरेशी माजी नगरअध्यक्ष दीपक देसले आदी उपस्थित होते.

विकास कामांना विरोध नाही
प्रा सुरेश देसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर मागील प्रोसिडींग वाचून कायम करणे हा विषय पहिलाच असतो. परंतु सत्ताधरी गटाने याविषयी अजेंड्यात उल्लेख केलेला नाही. मागील सभेच्या प्रोसिडींच्या नकला देखील देण्यात आल्या नाहीत. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. गावातील विकास कामांना आमचा कोणताही विरोध नाही. नगरअध्यक्ष हे लोकनियुक्त असल्याने आलेल्या निधीचे वाटप समप्रमाणात करून विकास कामे हाती घेण्यात यावीत.

चूक लक्षात आल्याने सभा रद्द
नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांनी विरोधाकांच्या भूमिकेवर टिका केली. नगराध्यक्षा वानखेडे यांनी अजेंड्यावर मागील सभेचे विषय तांत्रिक चुकीने घेण्यात आलेला नाही. विरोधकांनी सभात्याग करून योग्य केले नाही. झालेली चूक लक्ष्यात आल्याने सदर सभा रद्द करण्यात येऊन 17 मार्च रोजी घेण्यात येणार आहे यापुढे अश्या तांत्रिक चुका होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल.

अजेंड्यावरील विषयांना निर्बंध नाही
अजेंड्यावर किती विषय घ्यावेत यासाठी कोणतेही निर्बंध नाही तसे असल्यास विरोधी नगरसेवकांनी दाखवावे तसेच निधी उपलब्ध झाल्यास तात्काळ कामांना गती मिळावी यासाठी काही विकास कामे अगोदरच मंजूर करून घेण्यात येतात. यापूर्वी सत्तेत असतांना विरोधकांनी इतिवृत्ताच्या नकला मिळण्यासाठी कधीही आग्रही भूमिका घेतली नाही मग आत्ताच एवढी घाई कां असा प्रश्‍न नगराध्यक्षा रजनी वानखेडे यांनी केला.