शिंदखेडा नगराध्यक्षपदासाठी अखेरच्या दिवशी सात अर्ज दाखल

0

शिंदखेडा । नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी 71 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेना व समाजवादि पक्षाच्या उमेदवारांनी शक्ती प्रर्दशन करीत अर्ज दाखल केलेत. आज अखेर एकूण नगराध्यक्षपदासाठी 16 नगरसेवक पदासाठी 281 अर्ज दाखल झाले आहेत.उद्या अर्जाची छाननी आहे. समाजवादि पार्टी माजी प.स.सदस्य विजयसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली पार्टीच्या खान बिसमिल्लाबी गुलाम यांनी अध्यक्षपदासाठी व 14उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले.यावेळी गिरासे यांच्या रथ चौकातील घरापासून भव्य रॅली काढण्यात आली.उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होते.

शिवसेनेचे शक्ती प्रर्दशन
शिवसेना स्वतंत्रपणे प्रथमतःच नगरपंचायत निवडणूक सर्व शक्तीनिशी लढवित आहे.आज अखेरच्या दिवशी सेनेतर्फे अध्यक्षपदासाठी लताबाई रमेश माळी यांच्यासह 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.सेनेतर्फे शिवाजी चौकातील कार्यालयापासून भव्य मिरवणूक काढली. या मिरवणूकीत संर्पक प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतूल सोनवणे, हेमंत साळूंके , विश्वनाथ पाटिल, सर्जेराव पाटील यांच्यासह उमेदवार व शिवसैनिक सहभागी होते. त्याशिवाय कॉग्रेस 7, राष्ट्रवादी एक, भाजपा 7, अपक्ष 27, लोक क्रांती सेना एक असे एकूण 71 अर्ज दाखल झाले.

भाजपातर्फे नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज
नगराध्यक्ष पदासाठी देशमुख मालती श्यामकांत(अपक्ष), वानखेडे रजनी अनिल’ (भाजपा), माळी लिला देविदास(भाजपा), देसले निकिता पवन (कॉग्रेस), माळी ललिता दिनेश (शिवसेना) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरसेवक पदासाठी शैला रमेश देसले, चौधरी प्रकाश रतन, थोरात संगिता किरण, माळी ज्योती मनिष, निर्मला युवराज माळी, गणेश दगा मराठे ,देसले उदय अरूण ,बोरसे अनिता अनिल, रजूबाई सुभाष माळी, राजपूत राजनसिंग ठाणसिंग, पवार विनायक अभिमन,यांच्यासह 71 अर्ज दाखल झाले.

सेनेच्या कामगिरीकडे लक्ष
शिंदखेडा नगराध्यक्षपदासाठी 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे. आज अर्ज भरण्याच्या अखरेच्या दिवशी 7 उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणूकीत सेनेना कशी लढत देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ही निवडणूक शिवसेना प्रथमच स्वंतत्र लढवित असल्याने नगराध्यक्षपदी सेनेची वर्णी लागेल का याबाबत चर्चा रंगत आहे. सेनेने अर्ज दाखल करतांना भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केलेले आहे.