योजनेच्या लाभासाठी चार हजारांची लाच भोवली ; धुळे एसीबीची कारवाई
शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या मंजूर अनुदानातील एक लाख 13 हजार 120 रुपयांचे बिल काढून देण्यासाठी चार हजारांची मागणी करणार्या शिंदखेडा पंचायत समितीतील लघू सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता शरद फकिरा पाटील (52) यांना मंगळवारी दुपारी लाच घेताना सोनगीर बसस्थानकात रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईने लघूसिंचन विभागातील लाचखोर कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शेतकर्याच्या तक्रारीवरून गुन्हा
30 वर्षीय तक्रारदार शेतकर्याच्या आईची वायपूर शिवारात गट 100/अ 1 हेक्टर 21 शेतजमीन आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन लाख 90 हजारांची सिंचन विहिर मंजूर झाली होती. विहिर खोदकामासाठी सुरुवातीला शेतकर्याच्या आईला एक लाख 76 हजार 880 रुपये प्राप्त झाले होते. एर्वरीत अनुदानाची रक्कम एक लाख 13 हजार 120 रुपये थकीत असल्याने हे बिल काढून देण्यासाठी आरोपी शरद पाटीलने तक्रारदाराकडे चार हजारांची लाच मागितली होती. शेतकर्याला लाच द्यावयाची नसल्याने त्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 18 रोजी लाचेची पडताळणी करून मंगळवारी सापळा रचण्यात आला. सोनगीर बसस्थानकाजवळील पुलाजवळ रक्कम आरोपी स्वीकारत असताना आरोपीवर झडप घालण्यात आली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, जयंत साळवे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.