शिंदखेडा बस डेपो बंद करण्याच्या हालचाली वरीष्ठ पातळीवर सुरू!

0

शिंदखेडा । उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवून देखील उत्पन्न वाढीपेक्षा तोटाच अधिक होत असल्याने शिंदखेडा बस डेपो बंद करण्याच्या हालचाली वरीष्ठ पातळीवर सुरू असल्याची चर्चा डेपो परिसरात दबक्या आवाजात सूरू आहे. आगाराचा तोटा महिन्याला 45 लाख रूपयांच्या वर आहे. डेपो बंद करण्याच्या हालचाली होत असल्यास त्या वेळीच थांबविण्याची गरज आहे. शिंदखेडा हे तालूक्याचे ठिकाण असून पन्नासपेक्षा अधिक गावे दररोज संपर्कात असतात. या गावातील नागरिकांना बस सेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. आगारातील विस्कळीत झालेल्या नियोजनाचा त्रास सहन करूनही नागरिक बस प्रवासाला प्राधान्य देतात. दरम्यान डेपो बंद होण्याच्या हालचालीच्या चर्चेबाबत विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांना विचारले असता डेपो बंद होण्याची चर्चा निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. डेपो बंद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

रोज 45 फेर्‍या
शहरासह परिसरातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी माजी आ.ठाणसिंग जिभाऊ यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून शहरासाठी डेपो मंजूर करून आणला. प्रथमतः बस स्थानक जुन्या आमदार निवास म्हणजे आताच्या शिवाजी चौफूली परीसरात होते. शिंदखेडा येथे सद्यस्थितीत स्टेशन रोड परिसरात अद्ययावत असे बस स्थानक आहे. या बसस्थानकातून दररोज लांब पल्ल्याच्या तसेच लहान पल्ल्याच्या जवळपास 45 फे-या होतात. तालूक्यातील बहूसंख्य गावांमधील लोकांना जिल्ह्याशी संपर्क साधण्यासाठी शिंदखेडा बसस्थानकावरच यावे लागते.

नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय
तालुक्यातील जवळपास 50 च्यावर गावातील नागरिक शिंदखेडा येथे ये-जा करतात. परिवहनाच्या अनियोजित धोरणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्याचबरोबर धमाणेपासून ते बेटावद पर्यंत आणि सोनेवाडीपासून ते चिमठाणे पर्यंतच्या भागातील दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी शिंदखेडा येथे ये-जा करतात. यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. डेपो बंद झाल्यास या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे.

…तर जन आंदोलन उभारणार
शिंदखेडा डेपो बंद करण्याचा कट जर कोणी करत असेल तर तो हाणून पाडला जाईल. वेळ आल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस किरण चौधरी ,चंद्रकांत गोधवाणी, शहराध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी दिला आहे. तालुक्याच्या ठिकाणी विविध सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी जनतेने व लोकप्रतिनिधींनी मोठा संघर्ष केला आहे. या डेपोतील बहूसंख्य कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. डेपोच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने तोटा कमी होण्याऐवजी वाढत आहे. परंतू यावर डेपो बंद करणे हा पर्याय होऊ शकत नाही, असे किरण चौधरी यांनी दै.जनशक्तिशी बोलतांना सांगितले.