शिंदखेडा – येथील साई नगर येथील रहिवाशी भूषण सुनील मराठे वय 18 या तरुणाने हलाकीच्या परिस्थितीला कंटाळून साई नगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 8 सप्टें रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली या बाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूषण हा बांधकाम मिस्तरी म्हणून काम करत असे मागील दोन वर्षांपूर्वीच वडिलांचा निधनाने घरात मोठा असल्याने घराची जबाबदारी लहान वयातच त्याच्यावर आली. भूषण ला एक लहान भाऊ व एक विवाहित बहीण आहे. त्यातच आई नेहमी आजारी असल्याने उसनवारी पैसे घेऊन आईच्या औषध उपचार करत होता. सध्या पावसाने दळी मारल्याने शहरात बांधकाम व्यवसाय मंदी असल्याने त्याचे कामही बंद होते. परिवाराचा इतर खर्च हि त्यालाच करावा लागत असल्याने तो काही दिवसांपासून मानसिक त्रासात होता ह्याच कारणाने त्याने दि 8 रोजी राहत्या घरातील लोखंडी पाईपला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनला कलम 174 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक एस. डी. सैंदाने हे करीत आहेत