शिंदखेडा।* कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत चौथा लॉकडाऊन राज्यात सुरू झाला असला तरी काही प्रमाणात व्यवहार पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे नियोजन सर्व स्तरावर सुरू आहे. शिंदखेडा नगरपंचायत व तालुका प्रशासन यांनी लॉकडाऊनच्या या काळामध्ये सर्व नियमांचे पालन करत अत्यावश्यक सेवां बरोबरच इतर दुकाने उघडून व्यवहार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे दुकानदारांना दुकान उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिंदखेडा नगरपंचायतमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष रजनी वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, विरोधी गटनेते सुनील चौधरी, नगरपंचायत सदस्य विजयसिंह गिरासे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, तालुका प्रशासनाचे अधिकारी व व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र पाटील, उदय वानखेडे,मोहन परदेशी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मंगळवारपासून नियोजनाप्रमाणे शहरातील व्यवहार सुरू होणार आहेत.
देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्यात सर्व उपायोजना करण्यात आल्या. त्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आले. चौथ्या लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. जवळपास 47 दिवस लॉकडाऊनला झाले आहेत. या काळात शिंदखेडा तालुक्यात कोरोनाचा प्रसार पूर्णपणे रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. बाम्हणे व डांगुर्णे या गावातील परिस्थिती तात्काळ दक्षता घेऊन हाताळल्याने कोरोनाचा प्रसार थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले. शिंदखेडा शहरात नगरपंचायतीने लॉकडाऊनच्या काळात नागरिकांमध्ये केलेली जागृती व शहराच्या विविध भागात वेळोवेळी करण्यात आलेली फवारणी व त्याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे शहरात कोरेानाचा प्रार्दुभाव रोखण्यात प्रशासना सोबतच नगरपंचायतीला यश मिळाले. 31 मे पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी नगरपंचायतीतर्फे देण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा व भुसार माल विक्रेते, मेडिकल, कृषी विषयक सर्व दुकाने सोमवार ते रविवार सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तसेच भाजीपाला, फळ, मास, मासे व अंडी विक्रेते यांचे दुकान सोमवार ते रविवार सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानांमध्ये कापड दुकाने, रेडीमेड, गारमेंट्स सोने-चांदीची दुकाने, बूट व चप्पल विक्रेते, भांड्यांची दुकाने, टेलरिंग मटेरियल, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स कटलरी ही दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतील. याशिवाय मोबाईल शॉप विक्रेते व दुरुस्ती, इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, पेंन्टची दुकाने, फर्निचर शॉप, बिल्डिंग मटेरियल, कॉम्प्युटर विक्री व दुरुस्ती, प्रिंटिंग प्रेस, मिठाई व वेफर्सची दुकाने, चष्मा दुरुस्ती व विक्री, ऑटोमोबाईल्स, सायकल विक्री व दुरुस्ती, पंखे व कूलर दुरुस्ती दुकाने, सुट्टी चहा विक्री दुकाने आठवड्यातून बुधवार शुक्रवार व रविवार या दिवशी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतील, असे नगरपंचायत प्रशासनाने कळविले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने प्रत्येक सोमवारी बंद राहतील, याची व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी असेही पत्रकात म्हटले आहे. नियोजनाचा व आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीवर तसेच दुकानदार यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.नियोजनाप्रमाणे शहरातील व्यवहार 19 मे 2020 पासून सुरू होणार असल्याची जाहीर दवंडी नगरपंचायतीतर्फे देण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्रक शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे. शहरातील व्यवहार सुरू करण्याची मागणी शहर व्यापारी असोशिएशनने केली होती.