शिंदखेडा शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, शहरात होणार तीन दिवसांनी पाणीपुरवठा

देशातील विरोधक एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील---केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आत्मविश्वास.

शिंदखेडा( प्रतिनिधी) काँग्रेसने आपल्या सत्तर वर्षाच्या काळात गरीबी हटावचे आश्वासन दिले परंतु देशातील गरिबी दूर झाली नाही. देशातील गरिबी दूर करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हावे लागले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सुत्र घेतल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेसाठी फक्त विविध योजना अमलात आणल्या नाहीत तर चंद्रयान तीन सारख्या मोहिमा राबवून देशाला जगामध्ये बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मोदी हे सक्षम प्रधानमंत्री असून देशातील सर्व विरोधक एकत्र आले तरी मोदींचा ते पराभव करू शकत नाही व पुन्हा आगामी निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालीलच भाजप सत्तेवरील असा आत्मविश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. शिंदखेडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत बोलत सभेच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल होते.

या सभेस माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शिंदखेडा नगरपंचायतीची सभागृह नेते अनिल वानखेडे, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रजनी वानखेडे माजी जि प उपाध्यक्ष कामराज निकम कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सकाळी उशिरा साडेबारा वाजेनंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे शहरात आगमन झाले. त्यांनी कुमरेज परिसरात असलेल्या पाणीपुरवठा योजनेला भेट दिली व पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शहरातील गांधी चौकात शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळ्यात उद्बोधन करताना ते म्हणाले, केंद्रातील मोदी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यात एक रुपयांमध्ये पिक विमा योजना आणून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले. काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला कधीही विमा संरक्षण मिळाले नाही. या देशातील गोरगरीब जनतेला मोफत रेशन देण्याचा निर्णय देखील केंद्रातील मोदी सरकारने अंमलात आणला.

इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना महिलांना कुठल्याही मूलभूत सुविधा देखील मिळाल्या नाहीत. परंतु मोदी शासनाने उज्वला गॅस कनेक्शन, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना यासारख्या विविध योजना राबवून महिलांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

काँग्रेसच्या काळात नेत्यांनी फक्त देशाचा विकास न करता आपल्या कुटुंबाचा विकास कसा होईल याकडेच लक्ष दिले. या उलट मोदी सरकारने देशातील जनतेला केंद्रबिंदू मानून विविध क्षेत्रात विकासाची कामे हाती घेतली. काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राच्या वाटेला रेल्वे विभागासाठी अकराशे कोटी रुपये मिळत होते. परंतु केंद्रातील भाजप शासनाने महाराष्ट्राला रेल्वेसाठी 12000 कोटी रुपये दिले. देशामध्ये रेल्वेचे तसेच रस्त्यांचे जाळे विणून देशाला जगात महासत्ता बनविण्याच्या दिशेने देश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात देश अधिक सक्षम होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. भुसावळ सुरत रेल्वे गाडी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येईल. तसेच पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला असून ही गाडीही लवकरच सुरू करण्यात येईल असेही श्री दानवे यांनी सांगितले

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, धुळे जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यात व आमदार जयकुमार रावळ यांच्यात समन्वय आहे. केंद्राशी संबंधित असलेले प्रश्न मी सोडवितो तर राज्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांबाबत आमदार जयकुमार रावल पाठपुरावा करतात. गेल्या 40 वर्षापासून धुळे जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबित होते त्यात सुलवाडी जामफळ कानोली योजनेचा मावशी आहे या योजनेसाठी केंद्र शासनाकडून 240 कोटी रुपये मिळाले 80 टक्के काम योजनेचे पूर्ण झाले आहे. या वर्षात ही सिंचन योजना पूर्ण होईल यामुळे शिंदखेडा तालुक्यातील 100 आणि धुळे तालुक्यातील शंभर अशा दोनशे गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निकाली निघेल. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाबाबत पहिल्या फेज मधील धुळे नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे चार महिन्यात या मार्गावर टाकण्याचे काम सुरू होईल. शिंदखेडा तालुक्याला वरदान असलेल्या तापी बुराई योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात झालेल्या विविध विकास कामांमुळे या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याचे स्पष्ट केले‌. शिंदखेडा शहरासाठी पाणी योजना, प्रशासकीय इमारती, रस्त्यांची कामे करण्यात आली. या कामांसाठी लागणारा निधी मिळून आणण्यात विरोधकांनी अनेक अडचणी निर्माण केल्या. विरोधकांनी निर्माण केलेल्या या अडचणींवर मात करून विकास कामे करण्यात यशस्वी झालो. मी भाजपाचा आमदार असल्याने विरोधकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे 2016 मध्ये सत्तेवर आल्यानंतर व मंत्री झाल्यावर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे करून दुष्काळग्रस्त शिंदखेडा हा लागलेला डाग पुसण्यात यशस्वी झाल्याचे आमदार रावल यांनी सांगितले.

यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे सभागृह नेते अनिल वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास जिल्हा परिषद सभापती महावीरसिंह रावल, संजीवनी सिसोदे,पंचायत समिती सभापती वंदना ईशी, उपसभापती रणजित गिरासे,भिला माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख , युवराज माळी,सुभाष माळी,मिरा मनोहर पाटील,भाजप शहराध्यक्ष प्रविण माळी ,चेतन परमार, जितेंद्र जाधव ,किसन संकट, चंद्रकांत सोनवणे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस गिरासे तर आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी केले.

*** गेल्या वीस वर्षापासून शिंदखेडा शहरात कोणतीही अडचण निर्माण न होता व नागरिकांची तक्रार येऊ न देता नियमितपणे पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचारी पंडित माळी यांच्या सत्कार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.

*** शिंदखेडा शहराला मिळणार तीन दिवसाआड पाणी–शिंदखेडा शहरासाठी 21 कोटी रुपये खर्च केलेल्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असून या योजनेअंतर्गत सभागृह नेते अनिल वानखेडे, व सर्व नगरसेवक यांच्या प्रयत्नाने व माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा शहरात 4000 नळ कनेक्शन मोफत देण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजना एक महिन्यात पूर्ण होणार असून कार्यान्वित होणार आहे. योजनेद्वारे शिंदखेडा शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.