पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले कौतुक
शिंदखेडा- शहरातील झुलेलाल मंदिर झालेल्या चोरीसह दुचाकी चोरी तसेच एलसीडी चोरी प्रकरणासह पाटणच्या आशापुरी देवी मंदिराच्या निवासस्थानातून भक्तांचे चोरीस गेलेल्या मोबाईल प्रकरणी तीन अट्टल आरोपींच्या मुसक्यात पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यासह त्यांच्या पथकाने आवळल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली देत मुद्देमालही काढून दिला आहे. या चोरी प्रकरणी पवन कोमलसिंग गिरासे, रमेश उर्फ राहुल सुनील मराठे, रीरयाज उर्फ राजा रफिक शेख (सर्व रा़ शिंदखेडा) यांना अटक करण्यात आली़ दरम्यान, या गुन्ह्यातील अल्केश उर्फ भटू सुरेश माळी, राहुल गोपाळ पाटील आणि अजय (पूर्ण नाव माहित नाही) हे अद्याप पसार असून त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असे तिवारी यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
अन्य गुन्ह्यांचीही लवकरच उकल
पसा आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून त्यांच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येणार असून या आरोपींनी शिंदखेडा शहरात अनेक चोर्या केल्याने त्यादेखील उघड होतील, असेही निरीक्षक दुर्गेश तिवारी म्हणाले. आरोपी राहुल गोपाळ पाटील याने शिंदखेडा शहरात अॅक्वा रिदम पाणी वॉटर वाल्यास पिस्तोल लावून धमकावले असून त्याच्या मागावर विशेष पथक नेमण्यात आले असून तो देखील लवकरच पोलिसांच्या कोठडीत असेल, असेही ते म्हणाले.
यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शिरपूर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेड्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, महिला पोलिस उपनिरीक्षक गीतांजली सानप, पोलिस उपनिरीक्षक एस़ एच़ सैय्यद, पोलिस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, रफिक मुल्ला, पोलिस कर्मचारी प्रवीण निंबाळे, संजय सैंदाणे, एकलाख पठाण, बिपीन पाटील, आबा भील, मयूर थोरात, हर्षल चौधरी, ललित काळे, कपिल लिंगायत, प्रशांत पवार आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.