शिंदखेड्यात आरोग्य केंद्र ठरले कचराकुंडी

0

शिंदखेडा । शहरात रूग्णांना चांगली वैद्यकिय सेवा मिळावी या उद्देशाने दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आली होती. मात्र ही उपकेंद्र सुरू होण्या अगोदरच बंद झाल्याने शासनाचे 26 लाख रूपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे. सद्यास्थितीत हे आरोग्य उपकेंद्र कचरा कुंड्या झाले आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून शहराच्या विविध भागांमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी तत्कालीन पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी केली होती. दरम्यान चार पैकी दोन ठिकाणी हे उपकेंद्र सुरू करण्याची मान्यता देण्यात आली होती. त्यानूसार सध्याच्या नगरपंचायत चौकात आणि माळी वाड्यामध्ये ही उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत. यात नगरपंचायत चौकातील उपकेंद्रासाठी 12 लाख तर माळीवाड्यातील उपकेंद्रासाठी 14 लाख रूपये निधी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत मंजूर करण्यात आला होता.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी फिरवली पाठ
शिंदखेडा शहरात नगरपंचायत झाल्यापासुन म्हणजेच चार वर्षापासुन या उपकेंद्रांना धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राशी सलग्न करण्यात आले आहे. धमाणे केंद्र शहरापासुन जवळपास 20 किमी लांब आहे. या केंद्रातील कर्मचारी अथवा वैद्यकिय अधिकारी उपकेंद्राकडे फिरकत देखील नाही. परिणामत: या उपकेंद्राच्या उभारणीसाठी शासनाने मंजूर केलेले 26 लाख रूपये वाया गेले असल्याचेच चित्र आहे. उपकेंद्राच्या या दुरावस्थेला जबाबदार कोण? याची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपकेंद्र बनले गुरे, डुकरांचे निवासस्थान
जिल्हा आरोग्य विभागाने जि.प.शाळा क्र.6 जवळ नदीच्या काठावर उपकेंद्र सुमारे 6 वर्षापुर्वी बांधण्यात आले होते. या उपकेंद्राच्या उदघाटनापुर्वीच चोरट्यांनी दरवाजे,खिडक्या रात्रीतूनच लंपास केल्या. शहराची निम्मी लोकसंख्या माळीवाडा,सावतानगर,जनतानगर या भागात राहते. उपकेंद्राची जागाच नदीत पुररेषेच्या आत आहे. सद्यास्थितीत गुरे,डुकरे याठिकाणी राहतात. शासनाचा प्रामाणिक हेतू असतांना ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने योजनांची कशी वाट लावतात याचे हे उदाहरण आहे.

उपकेंद्र उभारली अद्याप कामकाज नाही
या उपकेंद्रात दोन परिचारीकांची नियुक्ती आणि प्रसुती अत्यावश्यक सेवा रूग्णांना देण्यात येणार होत्या. मात्र ही उपकेंद्र उभी तर राहिली परंतू सुरू होवू शकली नाही. या इमारतीची देखभाल न झाल्याने खिडक्या, दरवाजे व इतर साहित्य चोरीला गेले. सद्यस्थितीत माळी वाड्यातील उपकेंद्राची इमारत तर कचरा कुंडी झाली असून धुळखात पडली आहे. या उपकेंद्रांना नवसंजीवणी देण्याऐवजी उपकेंद्राचे आरोग्य बिघडवण्याचे काम वैद्यकीय अधिकार्‍यांनीच केले असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे.

शहरातील रूग्णांना तात्कालीन प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या अपुर्ण वैद्यकिय सुविधांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत दोन उपकेंद्रे मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी 26 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतू उपकेंद्रांचा उपयोग मात्र रूग्णांना झाला नाही. उपकेंद्र बंद अवस्थेत आहेत. लोकप्रतिनिधी प्रयत्न करून निधी मंजूर करून आणतात मात्र अधिकार्‍यांकडून योग्य ती देखरेख न झाल्याने शासनाचा निधी वाया गेला आहे.
-सुभाष माळी, माजी पं.स.सदस्य