शिंदखेड्यात चौधरी कुटूंबियांतर्फे स्वखर्चाने स्टँडपोस्ट

0

शिंदखेडा । येथील साईनगरामधील चौधरी कुटूंबियांनी आपल्या मालकीच्या विंधनविहीरीतून नगरामध्ये चार प्रमुख ठिकाणी पाण्याचे स्टँडपोस्ट बांधून परिसरातील ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा सुुरु केला आहे. माजी उपसरपंच गंगूबाई बाजीराव चौधरी आणि सुनिल बाजीराव चौधरी यांनी प्रल्हाद चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त ही पाणीयोजना सुरु केली आहे. साईनगरामधील चार ठिकाणी या स्टँडपोस्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गटनेे अनिल वानखेडे, माजी आ. रामकृष्ण पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नथा पाटील, अ‍ॅड. बी.झेड. मराठे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

वाढदिवसाचे औचित्य साधून राबविला समाजोपयोगी उपक्रम
शिंदखेडा शहरासाठी ना.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून पाणीयोजना मंजूर झाली आहे. योजनेचे काम पुर्ण होण्यास वर्षभराचा काळ लागणार आहे. सद्यास्थितीत अक्कडसे, सुकवद, बुराई प्रकल्प या विविध योजनांमधून पाणीपुरवठा होत आहे. वाढत्या तापमानात पाण्याची जास्त गरज लक्षात घेवून गंगूबाई चौधरी यांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी केलेल्या बोअरमधून विनामुल्य पाणीपुरवठ्याची कल्पना मांडली. त्यास सुनिल चौधरी यांनी आपल्या लहान भावाच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विविध भागामध्ये स्वखर्चाने स्टँडपोस्ट तयार केले. दररोज चार तास विनामुल्य पाणी पुरविण्याचा संकल्प असल्याचे सुनिल चौधरी यांनी सांगितले. लवकरच या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका कार्यान्वीत करण्यात येईल असे चौधरी कुटूंबियांतर्फे सांगण्यात आले. वाढदिवसाला वायफळ खर्च करण्याऐवजी समाजउपयोगी उपक्रम राबविण्यार्‍या चौधरी कुटूंबियांचे परिसरातून स्वागत होत आहे. स्टँडपोस्ट उद्घाटन प्रसंगी मनोहर पाटील, प्रा.प्रदीप दिक्षीत, प्रा.दीपक माळी, प्रा.सतिष पाटील, प्रा.चंद्रकांत डागा, पंडीत देसले, सुभाष देसले, प्रविण माळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.