शिंदखेड्यात नियमांचे उल्लंघन; 12 हजाराचा दंड वसूल

0

शिंदखेडा:शहरात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार तसेच मोकाट फिरणार्‍यांवरही न.पं.चे मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांनी कारवाई केली. त्यात 33 दुकानदार यांच्यासह अन्य नागरिकांकडून जवळपास 12 हजार 300 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. हा दंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात न.पं.च्यावतीने कोरोनाच्या महामारीत दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासोबत प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अशा पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांनी आपल्या पथकासह शहरात दौरा केला होता. त्यात अनेक दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी तोंडावर मास्क न लावणे, सोशल डिस्टनचे पालन होत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांसह पथकाने अशांवर कारवाई केली. कारवाईसाठी तहसीलदार साहेबराव सोनवणे, मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, अभियंता अभिजित मोहिते, ईश्वर सोनवणे यांच्यासह कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पीएसआय सुशांत वळवी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.