नंदुरबार । तालुक्यातील शिंदगव्हाण येथील तरूणांनी जवळ असलेल्या काकर्दे गावात येवून प्रचंड धुमाकूळ घातल दहशतीचे वातावरण निर्माण केले. यावेळी तरूणांच्या दोन गटात तुफान दंगल झाली. त्यात एका तरूणाच्या पोटात चाकू खुपसून जखमी करण्यात आले. रविवारी रात्री काकर्दे गावात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी 11 तरूणांना अटक केली ऊसन त्यात एका बालगुन्हेगाराचा समावेश आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणावरून शिंदगव्हाण येथील 12 ते 15 तरूणांनी काकर्दे गावात येवून शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे दोन्ही गावाच्या तरूणांमध्ये बाचाबाची होवून त्यांचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले.
खंडेराव महाराज मंदिराच्या चौकात रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास हे सिनेस्टाईल नाट्य सुरू झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होते. यावेळी शिंदगव्हाण येथील तरूणांनी काकर्दे येथील दिपक राजेंद्र माळी (वय 23) या तरूणाच्या पेाटात चाकू खुपसल्याने गंभीर जखमी करण्यात आले. या जखमी तरूणावर डॉ.शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची गांभीर्यता पाहून तातडीने फौजफाटा दाखल
घटनेची गांभीर्यता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.राजेंद्र डहाळे यांनी गावात तातडीने पोलिस फौजफाटा पाठवला. त्यानंतर गावात शांतता पसरली. दरम्यान या प्रकरणी जखमी दिपक राजेंद्र माळी याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार शिंदगव्हाण येथील अक्षय विलास सोनवणे, चंद्रकांत बाबुराव पाटील, समाधान राजधर पाटील, राज उर्फ दिग्वीजय ईश्वर पाटील, नितीन जगन्नाथ सपकाळ, मयुर अशोक सोना, पावबा भिकन आखाडे, योगेश रमेश पाटील, मोनू दिलीप पाटील, हिमांशू पाटील, विशाल बाबू पाटील या 11 तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात हिमांशू पाटील हा बालगुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या प्रेम प्रकरणावरून हा वाद उफाळून आल्याने तरूणांमध्ये हाणामारी झाली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये हे करीत आहे.