जळगाव : जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांना शिंदे गटात सामील व्हा अन्यथा निधी मिळणार नाही, अशी धमकी देण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर ठाकरे गटाच्या सदस्यांनी यावर पलटवार करीत असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या समर्थकांना एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार हे शिंदे गटात अलीकडेच सहभागी झाले आहेत.
शिंदे गटात सहभागी होण्यासाठी धमकी
या आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेचे तसेच युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांना एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे समजते. शिंदे गटात सहभागी झालात, तर शहराच्या विकासकामांसाठी निधी देवू, अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील, अशी धमकी महापौरांना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विश्वासाला तडा जावू देणार नाही : महापौर जयश्री महाजन
मी शिंदे गटात सहभागी व्हावे म्हणून दबाव टाकण्यात येत असून शिंदे गटात सहभागी झालात, तर शहराच्या विकासकामांसाठी निधी देवू, अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील, अशी धमकी देण्यात आली असलीतरी अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मी निष्ठावंत शिवसैनिक असून जनतेचा शिवसैनिक म्हणून माझ्यावर जो विश्वास आहे, त्याला मी कदापि तडा जावू देणार नाही, अशी भूमिका महापौर जयश्री महाजन यांनी मांडली.