शिकाऊ डॉक्टराचा शॉक लागून मृत्यू

0

जळगाव । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील वसतीगृहात शिकाऊ डॉक्टरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी मृत डॉक्टरच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाविद्यालयाचे चेअरमन, रजिस्ट्रार आणि डिन यांच्या विरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रशांत संजय राठोड (वय-27) असे मयताचे नाव आहे.

डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात करत होता इंटर्नशीप
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील डॉ. प्रशांत संजय राठोड (वय 27) याने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तीन महिन्यांपासून तो याच महाविद्यालयात इंटर्नशीप करीत होता. तो मुलांच्या वसतीगृहातील खोली क्रमांक 314 मध्ये अक्षय मुले, विकास पाटील यांच्यासोबत राहत होता. रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास डॉ. प्रशांत याचा भाऊ श्रीकांत याला महाविद्यालयाचे रजिस्टार यांचा फोन आला. त्यांनी डॉ. प्रशांत याचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. प्रशांतचे वडील संजय तोळाराम राठोड (वय 47), श्रीकांत आणि त्यांचे नातेवाईक सोमवारी सकाळी महाविद्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास डॉ. प्रशांत हा त्याच्या खोलीत तारेवर कपडे वाळत घालत होता. त्यावेळी त्याला इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

वायरींग खराब असल्याची केली होती तक्रार
महाविद्यालयातील वसतीगृहाची इलेक्ट्रीक वायरींग खराब झाल्याची तक्रार डॉ. प्रशांत याने गेल्या वर्षीच केली होती. मात्र महाविद्यालय प्रशासनाने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. महाविद्यालय प्रशासनाने वेळीच त्याची दखल घेतली असती. डॉ. प्रशांत याचा मृत्यू झाला नसता. असा आरोप त्याचे वडील संजय राठोड यांनी यावेळी केला.

तिघांच्या विरोधात गुन्हा…
डॉ. प्रशांत मृत्यू प्रकरणी त्याचे वडील संजय राठोड यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली. त्यावरून महाविद्यालयाचे चेअरमन, रजिस्टार आणि डिन हे डॉ. प्रशांतच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.