शिक्रापूर । किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली असून तापमान 9 ते 10 से. डीग्रीपर्यंत खाली आलेले आहे. त्यामुळे रात्री शिक्रापूर परिसरात शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. वेळ नदीच्या परिसरात येणार्या तळेगाव ढमढेरे, जातेगाव, मुखई या गावांमध्ये थंडीचे प्रमाण जास्त आहे.
थंडीपाठोपाठ विविध आजारांनीही येथे डोके वर काढले आहे. ताप, सर्दी या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळच्या मोकळ्या हवेत फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून तळेगाव रोड, पाबळ रोड, मलठण रोड नागरिकांचे जॉगिंग ठिकाण बनत चाललेले दिसत आहे. कोल्ड क्रिमसह स्वेटर, कानटोपी, मफलर यांना चांगलीच मागणी वाढलेली आहे. तसेच रात्री मोती चौक, पाबळ चौक, भैरवनाथ मंदिर परिसरात तसेच विविध भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.