शिक्रापूरात अनधिकृत फ्लेक्स मनोर्‍यामुळे अपघाताचा धोका

0

शिक्रापूर । शिक्रापूर ता. शिरूर येथे पुणे-नगर रस्त्यावर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्सच्या मनोर्‍यामुळे अनेक लहान मोठे अपघात झालेले आहेत. अद्यापही या ठिकाणी मोठमोठे अपघात होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातदेखील वार्‍यामुळे फ्लेक्स फाटून विद्युत तारांमध्ये अडकून शॉर्टसर्किट होऊन मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे या ठिकाणी असलेले सर्व फ्लेक्सचे मनोरे धारकांवर कारवाई करून हे मनोरे काढून टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत.

विजेच्या तारा तुटल्याने मोठा स्फोट
अनेकदा वार्‍यामुळे फ्लेक्स फाटले जाऊन शेजारी असलेल्या विजेंच्या तारांना अडकून विजेच्या तारांचे घर्षण होऊन मोठमोठे आगीचे लोळ खाली पडत असतात. विजेच्या तारा तुटून नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. तसेच या होत असलेल्या प्रकारामुळे जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात दुपारच्या सुमारास आलेल्या वार्‍यामुळे येथील फ्लेक्स फाटला जाऊन शेजारील तारांना अडकला गेला आणि मोठा जाळ खाली पडून विजेच्या तारा देखील तुटल्याने मोठा स्फोट झाला होता. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी मोठ्या कष्टाने विजेच्या तुटलेल्या तारा तातडीने जोडल्या. अनेकदा अशा प्रकारे तारा तुटण्याचे प्रकार घडत असल्यामुळे या भागातील सर्व फ्लेक्सचे मनोरे काढून टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत. याबाबत विद्युत वितरण विभागाचे शाखा अभियंता व ग्रामपंचायत शिक्रापूर यांनी या भागातील फ्लेक्सचे सर्व मनोरे काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

शिक्रापूर येथे पुणे नगर रस्त्यावर असलेल्या शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भिमा यांसह आदी भागामध्ये मोठमोठे फ्लेक्स लावण्याची सध्या स्पर्धा सुरु आहे. या फ्लेक्समुळे यापूर्वी अनेकदा अपघात झालेले आहेत. यापूर्वी येथे एका ठिकाणी फ्लेक्सच्या मनोर्‍यावर चढून फ्लेक्स लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसला होता. एका ठिकाणी मनोरा वाहनांवर पडून चार वाहनांचे एकाच वेळी नुकसान झाले होते. तर एका ठिकाणी मोठ्या दुकानावर हा मनोरा पडून दुकानाचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी या दुकानामध्ये असलेले नागरिक सुदैवाने बचावले होते. असे प्रकार वारंवार होत असतानादेखील प्रशासनास जाग आलेली नाही.

सर्वात जास्त संख्येने व उंचीचे फ्लेक्सचे मनोरे हे पुणे-नगर रस्त्यावरील चाकण चौकातच लावलेले आहेत. चाकण चौकामध्ये असलेली दुकाने, हॉटेल्स, परगावी जाण्यासाठी तसेच शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी गाडीची वाहत पाहणारे विद्यार्थी असे मिळून जवळपास 300- 400 लोक चाकण चौकामध्ये नेहमी असतात. त्यामुळे एखाद्या वेळेस फ्लेक्स मनोर्‍याची दुर्घटना झाल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.