शिक्रापूर । जनसेवा प्रतिष्ठान व 1960 सालची शिक्रापूर शाळेतील सातवीची बॅच यांच्यातर्फे ज्येष्ठ गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नानासाहेब शिर्के (वय 90), विठाबाई तोडकर (वय 91), पांडुरंग जकाते (वय 86) व ज्ञानेश्वर भुजबख (वय 78) यांचे पाद्यपूजन, कृतज्ञता व सन्मान करण्यात आला.प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग राऊत तसेच डॉ. दिनकर कळमकर यांनी सर्व माजी विद्यार्थी-शिक्षकांना एकत्र आणले. या गुरुजनांनी आपल्याला घडवले, संस्कार केले. त्यामुळे जीवनात आपणास यशाकडे अखंड झेप घेण्याची प्रेरणा मिळाली, असे कृतज्ञतेचे उद्गार यावेळी विद्यार्थ्यांनी काढले. त्या काळात शिक्षण घेणे कसे अवघड होते. त्यामुळे या गुरुजनांचे महत्त्व किती होते हे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी यावेळी अधोरेखित केले.
शिक्षण संस्कार, जिद्द व समाजाविषयीची आत्मीयता, कृतीशीलता हा राष्ट्रनिर्मितीचा भाग असून श्री जनसेवा प्रतिष्ठान संघ संस्कारातून व या गुरुजनांच्या शिकवणीतून उभे राहिले आहे. समाज व देशापुढील सर्व आव्हाने झेलण्यासाठी या प्रतिष्ठानने चालवलेले वसतिगृह वंचितांसाठी आधार बनले आहे. त्यामुळेच हा सोहळा गुरुजनांना कृतार्थतेची जाणीव करून देणारा ठरला आहे, असे रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारक सुरेश तथा नाना जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमात हळदी कुंकुवाचाही कार्यक्रम झाला. गणेश टेमगिरे यांनी सूत्रसंचालन केले तर दिनकर कळमकर यांनी आभार मानले.