शिक्षणसम्राटांचा शिक्षकांच्या खिशावरच दरोडा
बारामती : राज्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी होत आहे. अण्णांनी महाराष्ट्रात खर्याअर्थाने झोपडीतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पण दुर्दैवाने याच पुरोगामी राज्यात शिक्षणसम्राटांनी अत्यंत घातक प्रथा पाडून शिक्षकांना लुटण्याचे काम सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्थांनी शिक्षकांकडून दरमहा पगारातून 2 टक्के विकास निधी या गोंडस नावाखाली खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विकासनिधी की खंडणी?
काही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सदरची माहिती दिली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील नामांकीत म्हणविल्या जाणार्या शिक्षणसंस्थांनी आता शिक्षकांनाच खंडणीसाठी वेठीस धरले आहे. विशेष म्हणजे, अगदी ठरवून या संस्था चालकांनी दोन टक्के विकास निधी संस्थेला द्यावयाचा असून तो बंधनकारक आहे. या निधीची कोणतीही पावती दिली जाणार नाही. तसेच या निधीबाबत कोठेही वाच्यता केल्यास बदली व त्याचबरोबर इतर त्रासांना सामोरे जावे लागले आहे, असा इशाराही शिक्षकांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक याबाबत वाच्यता करण्यास तयार नाहीत. यामुळे या गंभीर प्रकाराला अद्यापपर्यंत वाचा फुटली नाही.
तेरी भी चूप मेरी भी चूप!
एका संस्थेची पाच सहा जिल्ह्यात महाविद्यालये, विद्यालये व प्राथमिक शाळा असे प्रचंड जाळे आहे. या संस्थेचे जवळपास चार हजारच्यावर शिक्षक कार्यरत आहेत. या विकासनिधीखाली दरमहा वीस ते पंचवीस लाख रूपये सहजतेने जमा होतात. वर्षाकाठी तीन कोटीच्यावर या रकमा जमा होत असून, या पैशांचे नेमके काय केले जाते हाही एक मोठा प्रश्न आहे. चार ते पाच संस्थांनी अशाप्रकारचा निधी गोळा करण्यात सुरूवात केली आहे. याची सामान्य माणसांसमोर चर्चा नसल्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था आहे. या प्रकरणाची जाहीर वाच्यता होवू नये यासाठीची चांगलीच खबरदारी घेण्यात आली आहे. शिक्षक मात्र आपापसात चर्चा करताना दिसून येतात.
पगाराचा प्रश्न अद्यापही प्रलंबित
शिक्षकाला नोकरीत घेताना त्यास अनेक अर्थपूर्ण संकटांना सामोरे जावे लागते. बारामती, इंदापूर तालुक्यात असंख्य शिक्षक गेली दहा ते पंधरा वर्षे पाचशे ते हजार एवढ्या कमी मानधनावर काम करत आहेत. त्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. संस्थाचालकांनी अर्थपूर्ण व्यवहार करूनही न्याय मिळत नाही. गेली वीस वर्षापासून अधिक काळ शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असलेल्यांच्या मेहनतीच्या पैशावर या शिक्षणसम्राटांनी घाला घातला आहे. मात्र या प्रकरणाची जबाबदारी तसेच हे संकट रोखण्याचे काम म्हणजेच मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची असा प्रश्न आहे.
शिक्षणसम्राटांना द्यावा लागतात भेटवस्तू
काही ठिकाणी शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांच्या वाढदिवसाला महागडी चारचाकी वाहने अगर महागड्या वस्तू भेट देण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या संकटांनी शिक्षकांना घेरले आहे. त्यामुळे आणखी कोणकोणती संकटे भविष्यात येतील अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे. तसेच अशा प्रकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर गंभीर परिणाम होणार आहे. सरकारी पातळीवर या प्रकरणास कशा प्रकारे न्यायचे असाही प्रश्न शिक्षकांना पडला आहे. या नवीन प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून वातावरण गढूळ झाले आहे.