धुळे । सन 2010 नंतर शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे असंख्य डी.टी.एड. बी.एड. शिक्षण घेतलेल्या भावी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षकांच्या असलेल्या रिक्त जागा शासनाने त्वरित भराव्या या मागणीसाठी मंगळवारी डी.टी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशन संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला शिक्षक भरती संदर्भात निवेदन देण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना दिलेल्या निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक शाळा या एक शिक्षकी आहेत तर अनेक शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्ष 2010 नंतर शिक्षक भरतीच झालेली नाही. त्यामुळे जिल्हाभरात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. 8 वर्षांपासून बंद असलेली शिक्षक भरती शासनाने यावेळी प्रथमच सुरु केली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी शासनस्तरावर ऑनलाईन ‘पवित्र पोर्टल’ सुरु केले आहे. या पोर्टलवर 25 ते 30 मे या कालावधीत जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक भरतीची जाहिरात टाकावी. त्यामुळे शाळा सुरु होण्या अगोदर विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद उपलब्ध होतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. सोबतच 8 वर्षापासून शिक्षक भरतीच्या परीक्षेत असलेल्या डी.एड., बी.एड. भावी शिक्षकांना रोजगार देऊन न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे.
यांच्या आहेत स्वाक्षर्या
निवेदनावर धुळे जिल्हा विद्यार्थी संघटनेचे तुषार खोंडे, निलेश पाटील, अमोल महाजन, विवेक पाटील, देवेंद्र बिरारी, सुरेखा पोमनार, ऋषिकेश गोटे, शशिकांत सोनवणे, अमोल निकुंभे, राकेश शिरसाठ, पियुष शिंदे, पंकज चौधरी, प्रशांत निकम, भुषण खांडेकर, आनंदा पानपाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.