शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीत स्वत:ला गुंतवून घेणे गरजेचे

0

लांडगे सभागृहात पार पडली महापालिकेची राज्यस्तरीय शिक्षण परिषद

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले मार्गदर्शन

भोसरी : शिक्षक सध्या शिक्षण देण्यापेक्षा इतर कामांच्या चौकटीत अडकले आहेत. शिक्षकांनी ही साचेबद्धता सोडायला हवी. मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मुलांच्या मनातील गणित, इंग्रजी या विषयांची भिती घालविण्यासाठी शिक्षकच महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीत स्वत:ला गुंतवून घेणे गरजेचे आहे. तसेच समाजावर अध्यापकांचीच पकड असणे आवश्यक आहे, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी भोसरीत व्यक्त केले. कै. अंकुशराव लांडगे सभागृहात पिंपरी-चिंचवड महापालिक राज्यस्तरीय आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, प्रभारीअतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, विभागीय उपसंचालक मिनाक्षी अनारसे- राऊत, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षण समिती सदस्या अश्‍विनी चिंचवडे, विनया तापकीर, उषा काळे, सुवर्णा बुर्डे, शारदा सोनावणे,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या कमलादेवी आवटे आदी उपस्थित होते.

शिबिरांचे आयोजन करणार

पालिका आयुक्त हर्डीकर म्हणाले की, तुमच्या प्रत्येकामध्ये एक सर्जनशील शिक्षक आहे. बुद्धीकौशल्य आणि ज्ञानाचा वापर करु शकेल असा समर्थ नागरिक घडवायचे काम शिक्षकांना करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने मुलांच्या प्रगतीत स्वत:ला गुंतवून घेणे गरजेचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी समाजावर अध्यापकांचीच पकड असणे आवश्यक आहे. राजकीय पकड असून चालणार नाही. महापालिकेच्या शिक्षकांना कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता असेल तर ते सांगा. हवे ते प्रशिक्षण आणि ज्ञानवर्धनासाठीची शिबिरे आयोजित केली जातील. शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे या महापालिका तुमच्यासाठी तीन पावले नक्कीच पुढे येऊन तुम्हाला मदत करेल.

शिक्षकांनी हातभार लावावा

कमलादेवी आवटे म्हणाल्या की, मुलांच्या समस्या शिक्षकांनाच माहिती असतात. अध्यापन प्रक्रीयेत ते सहाय्यभूत ठरते. शाळेत येणारे प्रत्येक मुल शिकावे यासाठी शिक्षकांनी काळजी घ्यायला हवी. जशी पिंपरी-चिंचवड महापालिका श्रीमंत म्हणून ओळखली जाते तशी शहरातील मुलेही उत्तमरित्या चमकायला हवीत. मी स्वःत पिंपरी-चिंचवडच्या महापालिका शाळेची विद्यार्थिनी असून शाळांचा दर्जा चांगला आहे. तो उत्तरोत्तर वाढावा यासाठी शिक्षकांनी हातभार लावायला हवा, असे मिनाक्षी राऊत म्हणाल्या.

जाणकांनी केले मार्गदर्शन

शिक्षण परिषदेत विविध शाळांतील गुणवत्तापूर्ण उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी विविध जाणकारांचे मार्गदर्शन झाले. उद्घाटनानंतर सुरुवातीला ‘शिक्षकांपुढील आव्हाने आणि बलस्थाने’ या विषयावर अमोल जोग यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘शाळासिद्धी व डिजिटल शाळा’ या विषयावर आसिफ शेफ तर ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण व मंडल स्कुल’ विषयावर दामिनी मयंकर आणि मयुरेश भोईटे यांनी मार्गदर्शन केले. मध्यांतरानंतर ‘मातृभाषा शिक्षण प्रणाली, आव्हाने समस्या आणि उपाय’ यावर भगवान साळुंके तर ‘व्यक्तीमत्व विकास’ वर राजेश चव्हाण, ‘ज्ञानरचनावाद’ विषयावर डॉ. ज्ञानेश्‍वर पाटील, डॉ. राजेश बनकर मार्गदर्शन केले. त्यानंतर गुणवत्ता व प्रगत शाळा सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योत्स्ना शिंदे यांनी केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.