राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये व्यक्त केले मत
पिंपरी : राज्य शासनाच्यावतीने गतवर्षापासून शालेय स्तरावर इयत्ता सातवी ते नववीच्या पाठ्यपुस्तकात आमूलाग्र बदल करण्यात आले. त्या अनुषंगाने बी.एडच्या अभ्यासक्रमामध्ये देखील अनुरुप बदल होणे गरजेचे आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना गुरुकुल पध्दतीने शिक्षण शिकविण्यात येत होते. हल्लीच्या काळात शिक्षक हा मार्गदर्शकांची भूमिका बजावत आहे. विद्यार्थींना सक्षम करण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच नवनवीन गोष्टी लहान वयातूनच त्यांना आत्मसात करण्याची प्रेरणा शिक्षकांनी देण्याची आवश्यकता आहे, असे मत शिक्षणतज्ञ प्रा. कुलदिपसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत चिंचवड येथील प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने सुधारीत माध्यमिक अभ्यासक्रम (2017) व बी.एड. अभ्यासक्रमातील विषय शिक्षणाची उजळणी याविषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अरिहंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुजाता आडमुठे, कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, ब्रिगेडियर अजयकुमार लाल, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, सल्लागार डॉ. के. आर. पाटेकर आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी वेगळा आदर्श ठेवावा
प्रा. सुजाता आठमुठे म्हणाल्या की, शिक्षकांनी आपल्या पेशात स्वतःला झोकून देत वेगळा आदर्श समाजासमोर ठेवावा. आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी व आनंददायी करावी. इतरांशी तुलना करता कामा नये. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गीता कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गायकवाड यांनी तर आभार प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी मानले. प्रा. मनीषा पाटील, प्रा. सुषमा खंडागळे, प्रा. जितेंद्र वाघमारे, प्रा. सुनील भोग यांनी संयोजन केले.