शिक्षकांबाबत पूर्वीचा दृष्टिकोन राहिला नाही; आत्मचिंतनाची गरज

0

अजित पवार ः जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ

पुणे । आईवडिलांइतके शिक्षकांनाही पूर्वी महत्त्व दिले जात होते. मात्र सामाजात शिक्षकांबद्दलचा तो दृष्टिकोन आता राहिला नाही. हे दुर्दैवी असून याबाबतचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, दौलत देसाई, यशवंत शितोळे, प्रवीण माने, राणी शेळके, सुरेखा चौरे, सुजाता पवार, जालिंदर कामठे, शैलजा दराडे आदी उपस्थित होते.

शिक्षणाधिकार्‍यांचे अज्ञान
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ११ हजार ६२५ इतकी शिक्षकांची संख्या आहे त्यामध्ये महिलांची संख्या किती आहे? असा प्रश्‍न शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांना अजित पवार यांनी विचारला. त्यावर त्यांनी माहीत नसल्याचे सांगितल्याने. त्यावर लगेच पवार उत्तरले महिलांंनाच महिला शिक्षकांची संख्या माहीत नाही! आणि सभागृहात शिक्षणाधिकार्‍यांच्या अज्ञानावर हशा पिकला.

अनेक शाळांची दुरुस्ती आवश्यक
वळसे पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग शिक्षकांमुळेच राज्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यात अनेक शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे तसेच नवीन शाळा बांधण्यासाठीही निधी कमी पडत आहे. यासह इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले तर सूत्रसंचालन आशिष जराड यांनी मानले.

दुर्गम भागातही जाण्याचा इशारा
पवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना चांगल्या सुविधा द्या. सेमी इंग्रजी माध्यम, ई-लर्निंग, आयएसओ शाळांचे प्रमाण वाढले पाहिजे. तरच भविष्यात मुले शहरातील मुलांच्याबरोबरीने स्पर्धा करू शकतील. शाळेच्या परिसरातील उद्योजकांकडून सामाजिक दायित्व निधीमधून शाळेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये बेंच उपलब्ध करून द्या. अलिकडच्या काळात शिक्षण विभागाकडून अनेक फतवे काढले जात असून त्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे़ बदल्यांबाबत शासनाने सूत्र ठरवावे़ जिल्ह्यातील शिक्षकांना हवेली तालुक्यात बदली अपेक्षित असते मात्र ती मिळत नाही. भोर, वेल्हे, जुन्नर आंबेगावसारख्या दुर्गम भागातही तुम्हाला जावेच लागेल, अशा इशारा पवार यांनी शिक्षकांना दिला.