शिक्षकाने विद्यार्थ्यांना बदडले!

0

धानोरा येथील प्रकार : पालकांमध्ये संतापाची लाट
धानोरा- येथील झि.तो. महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील चार ते पाच विद्यार्थ्यांना शिक्षकाने बदडल्याची घटना आज उघडकीस आली असून पालकांनी शाळा गाठत संताप व्यक्त केला.

हे  विद्यालय सातत्याने या-ना त्या कारणाने चर्चेत असून विद्यार्थ्यांना नाहक बदडल्याने पालकांनी मुख्याध्यापकांच्या कक्ष गाठून तीव्र संताप व्यक्त केला. काल   10 रोजी शाळेतील काही विद्यार्थ्यांचे भांडण जि.प मराठी शाळेच्या परिसरात झाले होते. शिक्षक समाधान महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर महाजन यांनी पारस सुरवाडे यासह अन्य विद्यार्थ्यांना बदडले. पायावर मारहाणीचे वळ उमटले असून विद्यार्थ्यांनी ही घटना पालकांना सांगितली नाही मात्र रात्रभर विद्यार्थ्यांना झोप न आल्याने आज सकाळी विद्यार्थ्यांनी आपबिती सांगितल्यानंतर पालकांनी शाळा गाठली. संबंधीत शिक्षकाविरुद्ध पालकांचा संताप अधिकच वाढत होता.

गेल्या आठवड्यातच राज्य सरकारने छडी इतिहासातून बाद केली असून विद्यार्थ्यांना मारहाण न करण्याचा निर्णय घेतला असतानाच धानोर्‍यात हा प्रकार घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. कायदे कठोर होत असताना देखील विद्यार्थ्यांना मारहाण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांना तंबी द्यावी अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांचे भांडण झाल्याने त्यांना शिक्षकांनी शांत राहण्याचा सल्ला दिला. घडला प्रकार योग्य नसून शिक्षकाला समज देण्यात आली आहे. पालकांची समजूत काढण्यात आली असून यापुढे असे प्रकार होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल.
– के.एन.जमादार, मुख्याध्यापक

धानोरा येथील शाळेत घडलेल्या प्रकाराची अद्याप माहिती नाही. मात्र या शाळेबद्दल दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. घडल्या प्रकाराची माहिती घेवून संबंधीतांना सक्त ताकीद देण्यात येईल. प्रसंगी कारवाई देखील करु.
– देविदास महाजन, शिक्षणाधिकारी, जि.प