पुणे । माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती 2005पासून बंद असल्याने कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तांना तात्काळ मान्यता देण्यात याव्यात. माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासांरख्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या वतीने 18 सप्टेंबरला आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक कार्यालयाच्यासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
खांडेकर म्हणाले, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वेतन व वेतन श्रेणीस संरक्षण मिळावे, विनाअनुदानित तुकडीवरील विद्यार्थी संख्या शिक्षकेतर पदे मंजूर करताना ग्राह्य धरावी, विधान परिषदेतील शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचार्यांना मिळावा. यांसारख्या अनेक प्रलंबित मागण्या आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. यावेळी संघटनेचे एस.डी. डोंगरे, संजय धुमाळ आदी उपस्थित होते.