शिक्षक आमदार बेमुदत उपोषणावर

0

मुंबई : मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतूनच झाले पाहिजेत, असा आग्रह धरणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यावर अखेर बेमुदत संपावर जाण्याची वेळ आली आहे. कपिल पाटील यांच्या या बेमुदत संपला महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी पाठिंबा दर्शवला असून या संपामुळे तरी सरकार जागे होईल, अशी आशा सर्व शिक्षक करत आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात येणारे पगार अचानक मुंबई बँकेतून करण्याची ताकीद दिल्याने घोटाळ्यात अडकलेल्या मुंबई बँकेतून शिक्षकांना महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळेल की नाही ही मोठी शंका शिक्षकांसमोर उभी राहिली आहे.

इतरही मागण्यांसाठी आंदोलन
हा मुद्दा गेल्या 2 महिन्यांपासून कपिल पाटील यांनी उचलून धरली असून सरकारने याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही आणि म्हणूनच आजपासून कपिल पाटील बेमुदत उपोषण करून सरकारचा निषेध करणार आहेत, अशी घोषणा करणारे ट्वीट करून त्यांनी याबाबत माहिती दिली. कपिल पाटील यांच्या या घोषणेला महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी पाठिंबा दिला असून प्रोत्साहन दिले आहे. हे उपोषण फक्त मुंबई बँकेतील शिक्षकांचे होणारे पगार या विषय संदर्भात नसून तर शाळेसंबंधी अनेक समस्यांबाबत असणार आहे.

शिक्षकांच्या नोकर्‍या धोक्यात
रात्र शाळेचे 1,010 शिक्षक 348 शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यातील दिवस शाळांमधील 7 हजार शिक्षक यांच्या सेवा सरकारने समाप्त केल्या आहेत. 2005 नंरच्या शिक्षकांच्या सेवाही समाप्त करण्यासाठी चौकशीच्या नोटीसा जारी झाल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार आणि मुंबई हायकोर्टाच्या सुमोटो आदेशानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या घालवण्याचे करण काय? 2012 नंतरच्या या शिक्षकांनी जायचे कुठे?, असा प्रश्न आमदार पाटील यांनी केला आहे.