शिक्षक पात्रता परीक्षेत प्रवेश न मिळाल्याने परीक्षार्थींनी आमदारांकडे मांडल्या व्यथा

0

धुळ्यात सुमारे 150 परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित

धुळे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेला उशिराने दाखल झालेल्या सुमारे 150 परीक्षार्थींना परीक्षेस बसू देण्यास मनाई करण्यात आल्याने त्यांनी आमदार अनिल गोटे यांच्याकडे कैफियत मांडली. तत्पूर्वी त्यांनी रविवारी सकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निवासस्थानी धडक दिली मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानी प्रवेश न मिळाल्याने परीक्षार्थींनी आमदार अनिल गोटे यांची भेट घेऊन आपली कैफीत मांडली. धुळे शहरात सकाळच्या सत्रात 9 केंद्रावर टीईटीची परीक्षा झाली. पहिल्या सत्रात दहा वाजेनंतर येणार्‍या परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने आधीच दिला असताना काही परीक्षार्थी शहरातील कनोसा कॉन्व्हेंट, जयहिंद हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या केंद्रावर सव्वा दहा पर्यंत पोहचले. वेळेत न आलेल्या परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या परीक्षार्थींना शिक्षण विभागाला निवेदन देण्याचे सांगून शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परीक्षार्थी माघारी परतले.