जळगाव। जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली में, जुन महिन्यात करण्यात येत असते. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे शिक्षक बदली संदर्भात आढावा घेतला जात असून बदली संदर्भातील चाचपणी सुरु करण्यात आली आहे. बुधवारी 12 रोजी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिये संदर्भात बैठक घेण्यात आली. शिक्षक संवर्गाची मोठी संख्या असल्याने इतर संवर्गापेक्षा असलेले भिन्न स्वरुप लक्षात घेऊन बदली संदर्भात वेगळा विचार करण्याचे शासनाने ठरवले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अवघड व सोपे क्षेत्राचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
17 एप्रिल रोजी होणार्या बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. 27 फेबु्रवारी रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या शासन निर्णयाचे यावेळी वाचन करण्यात आले. या शासन निर्णयानुसार शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार हे आता जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार अवघड व सोपे क्षेत्र ठरवून शिक्षण विभागातर्फे बदली करण्यात येणार आहे. अवघड क्षेत्रात तालुका मुख्यालयापासून दुर, येण्या जाण्यासाठी दळणवळणाचा अभाव, डोंगराळ तसेच दुर्गम गावे, शिक्षकांन काम करण्यास प्रतिकुल परिस्थिती आदी मुद्यांचा समावेश आहे. बैठकीला अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी देवांग, महाजन, फेगडे आदी उपस्थित होते.