जळगाव । यावर्षी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली ही राज्य शासनाच्या 27 फेबु्रवारी 2017 च्या शासननिर्णयान्वये करण्यात येत आहे. या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने शिक्षक संघटनने शिक्षक बदलीस आव्हान देत स्थगिती मिळावी यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. पहिल्या सुनावणीत बदलीस 30 जून पर्यत स्थगिती देण्यात आली होती. याचिके बाबत औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला असून बदली संदर्भातील मार्ग मोकळा झाला आहे. शासनाचा 27 फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णय अबाधित राहणार असून निर्णयान्वयेच बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 22 जून रोजी याबाबत सुनावणी होती. यावेळी ही याचिका फेटाळून लावली आहे.
बदलीचा मार्ग मोकळा
यावर्षी होणारी प्राथमिक शिक्षकांची बदली ही शासन निर्णयान्वये होणार असल्याने अवघड व सोपेक्षेत्र निहाय जिल्ह्याभरात सर्वेक्षण करण्यात आले होते. निर्णयात अनेक क्लिष्ट विषय असल्याने निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह जवळपास 20 जणांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी झाल्याने शासन निर्णयानुसार बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शाळांना सुरुवात होऊन दोन आठवडे होत आले असल्याने यावर्षी बदल्या होतील का याबाबत साशंकता होती. बदलीक्षेत्र ठरवण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आलेले आहेत.
व्हीडीओ कॉन्फरन्सिंग
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून बदलीपात्र शिक्षकांनी वेबपोर्टलवर अर्ज दाखल करण्यासंबंधी सुचना करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणाली असल्याने तांत्रिक अडचणी येत आहे. याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 28 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींगचे आयोजन करण्यात आले आहे.