शिक्षक भरती जाहिरातीत चूकीची वयोमर्यादा प्रसिध्द

0
शुद्धीपत्रक काढून मुदतवाद द्या : चाबुकस्वार
पिंपरी-चिंचवड : महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने मानधन तत्वावर 105 शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात महापालिकेने मागासवर्गीय वर्गासाठी चूकीची वयोमर्यादा प्रसिध्द केली आहे. या प्रक्रियेत शिक्षण मंडळाने शासन नियम व आदेशाचे पालन केले नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी महापालिकेने तातडीने सुधारीत शुध्दीपत्रक प्रसिध्द करून अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मागासवर्गीयांवर अन्याय
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण मंडळाच्यावतीने 105 शिक्षकांच्या जागा भरणेकामी जाहिरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये नियम व अटी या निकषामध्ये सदर जाहिरातीत खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 33 व मागासवर्गीय (एससी, एसटी) 18 ते 38 अशी दाखविण्यात आली आहे. वास्तविक शासनाच्या सुधारित अध्यादेशानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 पर्यंत नमूद करण्यात आली आहे. शिक्षण मंडळाने 38 वयापर्यंत मागासवर्गीयांना वयोमर्यादा स्पष्ट करून शासन नियम व आदेशाचे पालन न केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी महापालिकेने तातडीने सुधारित शुध्दीपत्रक काढावे. तसेच अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ देऊन न्याय देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.