शिक्षक सुसंस्कृत पिढी घडवितात- डॉ. गवळी

0

मॉडर्नमध्ये झाला विद्यार्थ्यांचा गौरव

निगडी- शिक्षक हे सुज्ञ, सुजाण, सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करत असतात. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार होणे म्हणजे घरातूनच खरी शाबासकी मिळणे होय. विद्यार्थी घडविण्याचे मोठे काम शाळा करीत असते. आजचे विद्यार्थी उद्याचे चांगले नागरिक होणार असतात. त्यासाठी त्यांच्यावर उत्तम संस्कार होणे आवश्यक असते, असे मत प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना ते बोलत होते. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला त्याच बरोबर 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या 25 विद्यार्थ्यांना व पालकांचे कौतुक करण्यात आले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 10वी व 12वीचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला. प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन पालक संघाची कार्यकारणी जाहीर केली. कार्यक्रमास प्रशालेच्या पर्यवेक्षिका सुमती पाटसकर व मावळत्या पालक संघ उपाध्यक्षा रुपाली जोशी उपस्थित होत्या.

शाळेतून झाले संस्कार
विद्यार्थी मनोगतामध्ये ज्ञानेश्‍वरी पाटील म्हणाली की, मॉडर्न शाळेने आम्हांला खूप चांगले संस्कार दिले आहेत. शाळेतून झालेल्या संस्कारांमुळेच मी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करून शाळेचे व कुटुंबाचे नाव मोठे करेन. संस्थेच्या व्हिजिटर मृगजा कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थी विनयशील हवा तरच यशापर्यंत पोहचू शकतील. आईने जिजाऊंप्रमाणे उत्तम संस्कार मुलांवर केले पाहिजेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहताना झोपेत न पाहता उघड्या डोळ्यांनी पहावीत. यासाठी पालकांनी आपल्या मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करावा. तरच पुढील शिक्षणाचा खडतर प्रवास सुकर होईल. त्यासाठी मुलांनी थोरांची पुस्तके वाचली पाहिजेत. शालासमिती अध्यक्ष शरद इनामदार म्हणाले की, पालकांनी वेळ काढून शाळेमध्ये वारंवार येऊन आपल्या पाल्याची माहिती घेतली पाहिजे. पालकांनी आठवड्यातून एकदा तरी दप्तर तपासून पाहावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कामथे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राजीव कुटे यांनी केला. विद्यार्थी यादी वाचन साधना राऊत व आभार सुजाता ठोंबरे यांनी केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कर्यक्रमास सहकार्य केले.