शिक्षणाचा हरवलेला अर्थ

0

शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. समंजस होतो. विचारशील होतो. त्याला भले-बुरे यांतील फरक समजू शकतो, असे म्हणतात. सार्वत्रिक शिक्षणामागचा उद्देशही समाजाच्या उत्थानाचाच आहे. तळागाळात शिक्षण पोहोचले तर त्याही मुलांचा विकास होईल. त्यांनाही सन्मानाने जगण्याचे मार्ग मिळतील, असा यामागचा विचार. पण हे खरेच साध्य होते का?

आजही आपल्या देशात शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी असली तरी, पोटाला चिमटा काढून पोराला शिकवणार्‍यांची संख्याही कमी नाही. आपण जे हलाखीचे आयुष्य जगलो ते मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी अनेक मातापिता वाट्टेल ते करायला सिद्ध असतात. पण खरेच या सगळ्यांची मुले चांगले आयुष्य जगतात का? पहिला प्रश्‍न उभा राहतो शिक्षणाच्या दर्जाचा. अभ्यासक्रम तर ठरलेला असतो पण, तो शिकवणारे शिक्षक मन लावून शिकवत असतील याची कुठलीच खात्री नसते. अनेक शाळांत तर स्वच्छतागृहसारख्या आत्यंतिक गरजेच्या सुविधाही नसतात. भिंतीला ओल, धोकादायक स्थितीतील स्लॅब, बंद पडलेले दिवे आणि पंखे अशा समस्याही नव्या नाहीत. अशा परिस्थितीत शिकवणारा शिक्षक आणि शिकणारा विद्यार्थी दोघांचेही शिक्षणावर लक्ष केंद्रित होणे अवघडच. बरे! त्यातूनही लक्ष केंद्रित करायचेच म्हटले तर शिक्षण साहित्याचा अभाव, इतर जबाबदार्‍या, घरा-दारातील बर्‍यावाईट अनुभवांमुळे मनावरचा ताण अशा अनेक गोष्टी सोबत असतात. या सगळ्या चक्रव्यूहाला भेदत लक्ष्य साधायचे म्हणजे लढणारा अर्जुनच असायला हवा. पण दुर्दैवाने सगळीच मुले इतकी प्रबळ नसतात. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती सुरु होते. काही जण शेवटपर्यंत लढत राहतात. चक्रव्यूह भेदतात. पदव्या मिळवतात. पण पुढची वाट न सापडल्याने त्यांचा ’अभिमन्यू’ होतो. स्वतःच्या, आईवडिलांची हलाखीची स्थिती बदलण्याचे स्वप्न धराशायी होते. शिक्षणातून सन्मान मिळण्याऐवजी ’पदवीधर बेकार’चा टॅग त्यांना अपमानित करत राहतो. सरकारने शिपाई किंवा सफाई कामगारांच्या जागांसाठी जाहिरात दिली तरी तिथेही या पदवीधर – व्दिपदवीधरांचे अर्ज येतात. अशास्थितीत शिक्षणामुळे सन्मानजन्य आयुष्य मिळते हे कितपत खरे मानायचे? अर्थात हा प्रश्‍न केवळ गरीब वस्तीतीलच नाही. लाखो रुपये भरून प्रवेश घेतलेल्या शाळेत मुलांना बसायला एसी क्लासरूम असेल. स्केटिंगपासून स्विमिंगपर्यंत सगळ्या सुविधा असू शकतील. पण जगण्याची मूल्य शिकवली जातील, याची खात्री मुळीच नाही. उलट अशा शाळा म्हणजे केवळ आणि केवळ ’परीक्षेतल्या गुणांचे कारखाने’ असण्याचीच शक्यता अधिक.

गुणवत्ता आणि कौशल्यांशी यांच्याशी त्यांचा काही संबंधच नसतो. तसेही मुल दहावीत असो की नर्सरीत, पालकांचा इंटरेस्ट त्याच्या गुणपत्रिकेतच असतो. शाळा, कोचिंग क्लास, चलतीत असलेला एखादा छंदवर्ग यापलीकडे सहसा कुणी जात नाही. बरं या छंदवर्गातही मुले आनंदासाठी जातात असे नाही. तिथेही जीवघेणी स्पर्धा असते. क्रिकेट क्लासला जाणार्‍या प्रत्येकाच्या डोक्यावर सचिन होण्याचे ओझे असते. बॅडमिंटन खेळणार्‍यांना सायना, सिंधू, कश्यप व्हायचे असते. सगळ्यांच्या नजरेसमोर कुठली ना कुठली स्पर्धा असते. पण त्यातही गंमत म्हणजे ह्या स्पर्धा त्यांना शाळेच्या परीक्षेचे वेळापत्रक सांभाळून खेळायच्या असतात. दहावीची तयारी म्हणून नववीपासूनच खेळ गुंडाळून ठेवायचे असतात. आणि तरीही आम्हाला ऑलिम्पिकची स्वप्ने पडत असतात.

बरं! ज्या दहावी-बारावीच्या मार्कांना, डॉक्टर – इंजिनिअरच्या पदवीला आपण इतके अन्यनसाधारण महत्व देतो त्यांचा प्रत्यक्षात उपयोग काय? चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळविण्यासाठी दहावीचे गुण अपरिहार्य आहेत हे मान्यच, पण चांगल्या कॉलेजेसची आपली नेमकी व्याख्या काय? आणि तसेही कितीही डोकेफोड केली तरी प्रत्येकाला 90-95 टक्के गुण मिळविणे शक्य आहे का? आणि समजा असे झालेच तर मेरिट लिस्ट 96-97 % वरच कट-ऑफ होईल, मग काय करणार? ज्या शर्यतीला एन्ड लाईनच नाही त्या शर्यतीत धावायचे तरी कशाला? पूर्वी 60 टक्क्यांवर चांगल्या कॉलेजेसमध्ये सायन्सला ऍडमिशन मिळायचे. आज 90 टक्क्यांनाही मिळत नाही. म्हणजे आजचे 90 टक्के आधीच्या 60 टक्क्यांच्या बरोबरीचेसुद्धा नाहीत. मग आपण नुसते आकडे फुगवत का बसलो आहोत? ज्या बुडबुड्यांना काही अर्थच नाही त्यासाठी खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेसना लाखोंची पुंजी का देतो आहोत? बरं एकदा ऍडमिशनचे सोपस्कार पार पडले कि त्या मार्कांना कुणी विचारतही नाही, मग हा अट्टाहास कशासाठी? केवळ जाहिरातींच्या भुलभुलैय्यामध्ये फसून आपापली तिजोरी रिकामी करण्याआधी पालकांनी याचा विचार अवश्य करायला हवा.

शिक्षण हे आयुष्य समृद्ध करण्यासाठी असते. वाचन लेखनातून जग समजून घेण्यासाठी असते. केवळ कुठली तरी सो कॉल्ड प्रतिष्ठित नोकरी मिळविण्यासाठी नाही, हे समजून घ्यायला हवे. आज अनेक पालक नर्सरीपासून पदवीपर्यंत मुलांच्या शिक्षणावर जेवढा खर्च करतात त्यातले अर्थे जरी साठवून ठेवले, तर तरुण वयात त्या मुलाला स्वतःचा उद्योग उभारण्याएवढे भांडवल उभे राहील. एका नोकरी मागे धावण्याऐवजी दहा जणांना नोकर्‍या देण्याएवढा तो सक्षम होईल. गरज आहे ती फक्त शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेण्याची. अन्यथा एक इंजिनिअरिंगचा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करणारे राहूल परेकरच जागोजागी दिसू लागतील. हे टाळायचे असेल तर ’शिक्षण म्हणजे गुणांची स्पर्धा नव्हे’ हे त्यांना सांगणारे कुणीतरी असायला हवे. त्याचबरोबर शालेय शिक्षण म्हणजे जीवन नाही, जीवनाचा तो एक छोटासा भाग आहे. पदव्यांशिवायही समृद्ध आयुष्य जगात येते, हेही त्यांना कळायला हवं.

– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका मुंबई
9322755098