जुन्नर । महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिक्षणाची वारी या कार्यक्रमात निवृतीनगरच्या साखरशाळेच्या उपक्रम पाहण्यासाठी शिक्षकांनी गर्दी केली होती. खेळातून गणित शिकण्याची संकल्पना यामध्ये मांडण्यात आली होती. राज्य शिक्षण विभागाने नाशिक येथील संदीप फाउंडेशन महिरावणी येथे शिक्षणाची वारी आयोजित केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शिक्षकांनी मंगळवारी या ठिकाणाला भेट दिली. या दौर्याचे नियोजन विस्तार अधिकारी अनिता शिंदे यांनी केले होते.
शिक्षकांची पुस्तक भिशी
शिक्षण विभाग मुंबई यांनी शिक्षक पुस्तक भिशी हा उपक्रम सादर केला होता. वेच्या गावीत यांनी हा उपक्रम सादर केला होता. रायगडमधील कर्जत तालुक्यात त्यांनी हा उपक्रम राबविला होता. या प्रकल्पाची दखल शासनाने तसेच अनेक वर्तमानपत्रांनी घेतली. हेच गावीत पुढील शिक्षण घेऊन राज्य शासनाकडे सेवेत दाखल झाले आहेत. आदिवासी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना या वारीला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांची जिज्ञासुवृत्ती वाढीस
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षणाची वारी हा उपक्रम राबविण्यात येतो. याठिकाणी 57 स्टॉल लावण्यात आले होते. साखरशाळेने खेळातून गणित शिक्षण हा उपक्रम ठेवला होता. शिक्षक नंदाराम टेकावडे, मधुकर भारमळ, दिपक मुंढे, योगेश कारभळ यांनी हा उपक्रम सादर केला. या उपक्रमातून विद्यार्थी हसत खेळत गणित शिकतात. खेळातून तयार होणार्या संख्या विद्यार्थी सहजपणे लक्षात घेतात. गणिती क्रिया चटकन अवगत करतात. विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती वाढीस लागते. अध्ययन मनोरंजक व आनंददायी होते. गणित विषयाची आवड निर्माण होते. साखरशाळेचा हा उपक्रम पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.