शिक्षणातून समाज उन्नतीचे स्वप्न भगिनी निवेदिता यांनी बघीतले!

0

जळगाव । मातृ भाषेतून शिक्षण यासोबतच मनुष्य निर्माण आणि राष्ट्र निर्माण या त्रिसुत्रीचा अवलंब शिक्षणात केला जावा असा आग्रह धरून शिक्षणातून समाज उन्नतीचे स्वप्न स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी धरला होता असे प्रतिपादन राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने सोमवार 8 रोजी डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाले अंतर्गत श्री.करमरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. केशवस्मृती प्रतिष्ठानने दिलेल्या देणगीतून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस.राणे होते. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील हे उपस्थित होते.

वस्तुस्थितीची कल्पना
भगिनी निवेदिता आणि महिला विश्‍व या विषयावर बोलताना करमरकर यांनी मुळ आर्यिश असलेल्या मार्गारेट नोबल या स्वामी विवेकानंद यांच्या भाषणांनी प्रेरित झाल्या आणि त्यांनी विवेकानंद यांच्या समवेत भारतात काम करण्याचा निर्धार केला. भारतात येण्यापूर्वी त्यांनी इंग्लंड मध्ये अध्यापनाचे काम केले होते. धर्म आणि अध्यात्म याबद्दल त्यांच्या मनात आकर्षण होते. स्वामी विवेकानंद यांनी त्यांना सामाजिक कार्यात धौर्याची गरज असते असे सांगुण वस्तुस्थितीची कल्पना दिली.

मातृभाषेतुन शिक्षण
1898 मध्ये सुखसंपन्नता सोडून ही तरूणी भारतात आली. विवेकानंद यांनी शारदादेवी यांच्याकडे त्यांना पाठविले. त्यातून भारतीय स्त्रीचे अस्सल रूप त्यांना कळाले. शुभ्र वस्त्र देवून त्यांना दिक्षा देण्यात आली त्यांनतर भगिनी निवेदिता यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आरंभ केला. बालिका विद्यालय सुरू केले. यामध्ये त्यांनी जीवन दर्शनाचे समग्र शिक्षण सुरू केले. समाजात कोणत्याही प्रकारच्या समस्या राहू नये यासाठी मातृभाषेतून शिक्षणाची अपेक्षा व्यक्त झाली.

पुस्तकाचे प्रकाशन
राष्ट्रीय चारित्र्याची जडण-घडण करण्याची क्षमता शिक्षणात असावी असा त्यांचा आग्रह होता. समाजाच्या उन्नतीचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि आयुष्यभर तो आग्रह धरला. यंदा निवेदिता यांची 150 वी जयंती आहे त्यानिमित्ताने महिलांनी त्यांच्या पैलूंचा अभ्यास करावा असे श्री.करमकर यांनी सांगितले. जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानविषयी रत्नाकर पाटील यांनी भूमिका मांडली, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सत्यजित साळवे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.राणे व प्रा.दीपक पवार यांनी संपादीत केलेल्या वाचक एक अमृतानुभव या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.