शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यायला हवे – दिलीप वळसे पाटील

0

रयत शिक्षण संस्थेतर्फे हडपसरमध्ये ‘कर्मवीर रयत मॅरेथॉन 2018’ चे आयोजन

हडपसर : खेळात चांगले काम करणे हीच खर्‍या अर्थाने कर्मवीर अण्णांना आदरांजली असेल. रन फॉर क्वालिटी एज्युकेशन हे आजच्या मॅरेथॉनचे ब्रीद वाक्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील मुलामुलींना शिक्षणाचा मार्ग खुला केला. केवळ शिक्षणच नव्हे तर ते शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. आपण आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यायला हवे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या पश्‍चिम विभागाने आयोजित केलेल्या कर्मवीर रयत मॅरेथॉन 2018 चा शुभारंभ वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

खेळातून आनंद मिळवा

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळास विशेष प्राधान्य द्यावे. खेळाच्या स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे हे महत्त्वाचे नसून फक्त खेळणे व त्यातून आनंद मिळवणे महत्त्वाचे असते. खेळामुळे शरीर सुदृढ व मन प्रसन्न राहते. रयत शिक्षण संस्थेच्या पश्‍चिम विभागाने राबविलेला मॅरेथान हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम असून तो भविष्यातही असाच चालू राहावा. ज्या महाविद्यालयाच्या मैदानावर मी खेळले व प्रशिक्षण घेतले तेथेच येण्याचा सन्मान मिळाला, असे विचार सायली केरिपाळे यांनी मांडले.

खेळामध्येच भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करावा : विजय चौधरी

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी विजय चौधरी उपस्थित होते. विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष द्यावे व खेळामध्येच आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करावा. शरीराबरोबरच बुद्धीचाही व्यायाम करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. अ‍ॅड. राम कांडगे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंचे मन व शरीर सदृढ बनते. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्मवीरांचे विचार समाजापर्यंत पोहोचतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सदाशिव सातव, दिलीप आबा तुपे, चेतन तुपे, भगवानराव बेंडे पाटील, रुपाली चाकणकर, अर्जुन मलगुंडे, संदीप पवार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

15,000 विद्यार्थ्यांचा सहभाग

या मॅरेथॉनमध्ये 15,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पुढे असे मुलामुलींचे स्वतंत्र गट करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.सूत्रसंचालन डॉ. विश्‍वास देशमुख व प्रभंजन चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अरविंद बुरुंगले तर आभार किसन रत्नपारखी यांनी मानले.