अमळनेर : कायद्याने शिक्षण बदलणार नाही, त्यासाठी मनात बदल झाला तरच शिक्षण बदलणार आहे. सद्यस्थितीत शिक्षण व्यवस्थेत साने गुरुजींचे विचारच इतरांना प्रेरणा देतील, असे मत शिक्षणतज्ञ हेरंब कुळकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले. येथील गलवाडे रस्त्यावरील साने गुरुजींच्या नियोजीत कर्मभूमी स्मारकावर साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, गटशिक्षणाधिकारी ए.डी. बिर्हाडे, साने गुरुजी स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ.अरविंद सराफ, चेतन सोनार, नवनाथ नेहे, दत्तात्रय सोनवणे, उमेश काटे उपस्थित होते.
श्री. कुळकर्णी पुढे म्हणाले, की ’शिक्षकांसाठी साने गुरुजी’ हे पुस्तक शिक्षण व्यवस्थेसाठी शेवटचे औषध आहे. हे औषध गुणकारी असेल तर शिक्षण व्यवस्था जीवंत राहू शकते. शिक्षक हे वाहक म्हणून काम करणार आहेत. आज 68 वर्षानंतरही साने गुरुजींची जादू पाहायला मिळते. त्यांची माया व हात आजही विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिसत आहे. साने गुरुजी हे रक्ताने लिहिणारे लेखक होते. साने गुरुजींचे पुस्तक हे केवळ शिक्षकांसाठीच असून, शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी एक चळवळ उभी राहाणे गरजेचे आहे. यावेळी श्यामची आई या पुस्तकावर आधारीत साने गुरुजी कथामालेचे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तसेच काही माध्यमिक शाळांमध्ये वाचन करण्यात आले होते. या शाळांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
यावेळी भैय्यासाहेब मगर, डी.ए.धनगर, भय्यासाहेब साळुंखे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ.अतुल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. आर.पी. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी गोपाळ नेवे, प्रा. सुनील पाटील, दर्शना पवार यांच्यासह साने गुरुजी शैक्षणिक विचार मंचचे सदस्यांनी सहकार्य केले.