सर्व शाळांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शिकवण्याआधी मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण शालेय मुले एकतर हिंसक बनत चालली आहे वा गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढत चालला आहे…’ असं मत मुंबई उच्च न्यायालयात मांडले गेले. या पार्श्वभूमीवर शाळेतील मुलामुलींना दरोजचं शिक्षण घेता-देता मुल्यशिक्षणाचे प्राथमिक धडे खरंच देता येतील का? व ते कसे घरोघरी द्यायचे यासंबंधी थोडी चर्चा…
सुरुवातीला शाळेत घडलेले दोन तीन प्रसंग नमुन्यादाखल आपण घेऊ या. तर, वर्गात ‘त्या ’ दोघांचं छोट्याशा कारणावरनं भांडण झालं. मारामारी झाली. पुढे शाळा सुटल्यानंतर त्यातील एकाने कंपासपेटीतील कर्कटकने दुसर्याची सायकल अक्षरश: फाडली. सीटकव्हर, टायरट्युब याची वाट लावत त्याने जवळपास पंधराशे रूपयांचं नुकसान केलं आणि ‘घेतला की नाही बदला ’ म्हणत आपल्यात लपलेली ‘हिंसकवृत्ती’ बाहेर काढली. दुसर्या प्रसंगात नववीतील चौघांनी त्यांच्याच वर्गातील एका मुलाला ‘उल्लू’ बनवत, धाक दाखवत 400 रुपयांमध्ये लुबाडले. त्याअगोदर त्याला एका मुलीवरनं चिडवत, धाक दाखवत बेजार करून सोडलं. तर तिसर्या प्रसंगात एका विद्यार्थ्याने वर्गातील काही मुलांची नवी दप्तरं दररोज फाडण्याची ‘शर्यत’ लावत त्यातील वस्तू बाहेर फेकत, वर्गात दहशत पसरवली आणि मुलांचं हजारो रुपयांचा नुकसान केलं. तिन्ही प्रसंग अनुभवल्यानंतर मी अधिक गंभीर होत, मनाशी एवढंच म्हणालो, ‘बरं झालं, यापैकी कुणा मुलाने हातात बंदूक घेत अमेरिकेतल्या मुलाने जशी सात वर्ग मित्रांची हत्या केली तशी केली नाही !
वरील सर्व प्रंग जेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आजच्या शालेय मुलांना खरंच मूल्यशिक्षणाचे धडे, तेही पहिली- दुसरीपासून देणे गरजेचे आहे का प्रश्न मनात येतो. आता मुलांवर संस्कार करायचे म्हणजे काय हो ? एक उदाहरण घेऊ या, ‘ हातपाय धुतल्याशिवाय जेवायचं नाही’ असं लहान मुलांना घरी,शाळेत सांगतात. आरंभी ही गोष्ट मुलं पुष्कळ वेळा विसरतात आणि हात न धुताच जेवायला बसतात. मग आसपासची माणसं त्यांना आठवण करून देतात. मुलं थोड्याशा नाखुशीनेच ताटावरनं उठून हात धुवून घेतात. मग ती जेवतात. सातत्याने ही गोष्ट करून घेतल्यामुळे ती इतकी अंगवळणी पडते की, अशा मुलांना मोठेपणी हातपाय धुतल्याशिवाय जेवायला बसणं योग्य वाटत नाही. यालाच चांगले संस्कार असं म्हणतात. या ठिकाणी अजून योग्य आपण ध्यानी घेतली पाहिजे की, वय वर्षे शून्य ते तीन, तीन ते सहा व सहा ते नऊ या वयोगटातील मुलांवर हे चांगले संस्कार घरीदारी विविध गोष्टींतून, प्रसंगातून दिले पाहिजेत. त्यासाठी सुसंवाद हा जसा महत्वाचा तसा घरातील सर्वांचा प्रवास देखील संस्कारी असावा. कारण आज घरीदारी काय होतंय, मत मांडणं म्हणजे भांडण, हे समीकरण वाढतेय. वाद करणे बरोबर नाही. पण मतभेद आणि भांडण यातील सुक्ष्म सीमारेषा ओळखणे महत्वाचे असते. कारण घरातील मुलं हे सारं छानसं टिपत असतात. व प्रसंगी तसं अनुकरण करत असतात.
अजून एक महत्वाचा मुद्दा मुल्यशिक्षणाबाबत आहे तो म्हणजे मुलांना घरीदारी होणारी शारीरिक, मानसिक शिक्षा असं लक्षात आलेय की ज्या घरांमध्ये सारखी भांडण होतात, मुलामुलींना शारीरिक शिक्षा करत सारखं बदडलं जातं ती मुलं कोडगी बनत हिंसक बनतात. यासाठी घरातील पालकांनी, शाळेतील शिक्षकांनी एक गोष्ट नेहमी ध्यानी घेतली पाहिजे की, मुलं मुली मोठी होत जातात, तसतसे त्यांच्यात शारीरिक बदल होत जातात अनेक मानसिक व भावनिक आंदोलनांचा त्यांना सामना करावा लागतो. त्यांच्यावरील जबाबदार्या वाढतात. बदलत्या काळानुसार व वाढत्या वयानुसार त्यांना स्वत: काही बदल करावे लागतात. या काहीशा अवघड अशा संक्रमण अवस्थेत पालकांनी, शिक्षकांनी जर त्यांना (त्यांचा ‘स्व’ दुखावत वगैरे) मारलं तर ती हिंसक बनत नाही ती कृत्यं करतात, नाही त्या मार्गाला जात बिघडतात. अशा वेळी घराने, समाजाने त्यांना आहे तसं स्वीकारत, प्रेमाने चार गोष्टी सांगत जवळ केलं पाहिजे.
मुंबई उच्च न्यायालयाने मुलांना मूल्यशिक्षण दिले पाहिजे, विज्ञान, तंत्रज्ञान शिकण्याआधी मूल्यांचे धडे दिले पाहिजे असं जे म्हटलेय त्या पार्श्वभूमीवर मी एवढंच म्हणेन घर, जी मुलांची पहिली शिक्षणसंस्था आहे व शाळा ही त्यानंतरची महत्वाची संस्था आहे त्या दोघांनी एकत्र येत, संवाद साधत गोष्टी, प्रसंग, विविध अनुभव, विविध भाषा यांच्या माध्यमातून त्याचं प्रबोधन करत त्यांना संस्कारीत केलं पाहिजे, ती आज काळाची मोठी गरज आहे !
– चन्द्रकान्त भंडारी,जळगाव
9890476538