मुंबई । मी शिक्षणमंत्री आहे शिक्षकमंत्री नाही, असे विधान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल्यामुळे शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. शिक्षणमंत्र्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर म्हणून शिक्षकांनी आता ‘मी शिक्षक असून ऑपरेटर नाही, मी शिक्षक असून आचारी नाही, मी शिक्षक असून कारकून नाही, मी शिक्षक असून बीएलओ नाही, मी शिक्षक असून बँक आणि आधार कर्मचारी नाही, असे थेट प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. शिक्षकांवर ऑनलाईन कामाचा भार पडत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून केल्या जात आहेत. त्याचसोबत शिक्षकांकडून ‘ऑनलाइन’ कामे बंद करावी, अशैक्षणिक कामांच्या जाचातून शिक्षकांची मुक्तता व्हावी, जुनी पेंशन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागण्यात आली. मात्र शिक्षणमंत्र्यांच्या विधानामुळे शिक्षक संघटनामध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
13 नोव्हेंबरला बेमुदत उपोषण
राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न 17 वर्षांत सुटलेला नाही. अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात मार्ग मोकळा झाला होता. मात्र त्यानंतरही अद्याप हा प्रश्न कायम आहे. या अनुदानाच्या प्रश्नाबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य विनाअनुदानित कृती समितीतर्फे मुंबईसह राज्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर 13 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. संघटनेतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर त्याचप्रमाणे राज्यातील 7 शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.