मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकुर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागुन राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत एक भाषिक पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकुर प्रसिध्द करण्यात आला आहे. याप्रकरणी तातडीने या पुस्तकाचे वितरण थांबवुन लेखक, प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी दोन दिवसांपुर्वीच मुंडे यांनी केली होती.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे चे उपसंचालक विकास गरड यांनी काल एक पत्रक काढुन सदर पुस्तकाचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ पुस्तक वितरणाचे आदेश थांबवुन चालणार नाही, तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकुर प्रसिध्द करणाऱ्या लेखक आणि प्रकाशकावर कारवाई केली पाहिजे. तसेच राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे मुंडे यांनी म्हटले आहे.
राज्यातील सरकार हे मनुस्मृतीच्या विचारांचे सरकार असल्यामुळेच वारंवार या घटना घडत असुन मनुस्मृतीचा प्रचार करणाऱ्या मनोहर भिडे सारख्या व्यक्तींना हे सरकार पाठीशी घालत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य येतेच कसे? आणि सरकार ते सहन कसे करते? असा सवालही मुंडे यांनी केला आहे.