रोजगाराची प्रमुख समस्येसह विविध मागण्या घेऊन पुण्यातून मुंबईकडे निघाला तरूणांचा मोर्चा
21 नोव्हेंबर रोजी हा मार्च होणार मुंबईत दाखल
देहूरोड : शिक्षण धोरणातील सततचे बदल त्याचबरोबर विविध समस्या आणि रोजगाराची प्रमुख समस्या सोडविण्यासाठी विविध मागण्या घेऊन पुण्यातून मुंबईकडे निघालेला विद्यार्थ्यांचा लाँगमार्च नुकताच देहूरोड येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या लाँगमार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. 21 नोव्हेंबर रोजी हा मार्च मुंबईत दाखल होणार आहे. शिक्षण आणि रोजगार हक्काबाबत विविध मागण्यांसाठी छात्रभारतीच्यावतीने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढण्यात आला आहे. शुक्रवारी हा मार्च देहूरोड मुंबईकडे रवाना झाला. शिक्षणाचे बाजारीकरण, कंत्राटीकरण आखाजगीकरण थांबवून केजी टू पीजी पर्यंत सर्वांना शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण मिळायला हवे, ही प्रमुख मागणी होती.
हे देखील वाचा
शाळा बंद करण्याचा घाट
याबरोबरच शिक्षणाबाबतच्या सुमारे 32 मागण्या घेऊन हे विद्यार्थी मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. डोंगरदर्यातील सुर्गम भागातील आदिवासी मुलांसह भटक्या व इतर मागसप्रवर्गातील मुलांना शिक्षणाचा घटनात्मक अधिकार नाकारला जात आहे. कमी पटसंख्येचे कारण देऊन शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे, त्याला छात्रभारतीने विरोध दर्शविला आहे. याबरोबरच शिक्षक-प्राध्यापकांची भरती, पात्र शाळांना अनुदान, शालेय पोषण आयोजनेला पर्याप्त निधी आणि काटेकोर अंमलबजावणी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांचा या लाँगमार्चमध्ये समावेश असून हि संख्या पुढे वाढत जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वांसाठी योजना
यावेळी या मार्चमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी आपली मते व्यक्त केली. प्रत्येकाला के जी टू पी जी शिक्षण मिळालेच पाहिजे, शिक्षण मिळालेल्या सर्वांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यामुळे सर्वांनाच शिक्षण मिळणार आहे. ही योजना सर्वांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांचा गांभिर्याने विचार करून त्या प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. ही योजना गरीबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.