उपसभापतीपदी होणार शर्मिला बाबर; भाजपतर्फे भरला अर्ज
पिंपरी-चिंचवड : महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपच्या नगरसेविका सोनाली गव्हाणे यांना मिळणार आहे. तर, उपसभापती शर्मिला बाबर यांची निवड होणार आहे. गुरुवारी सभापती आणि उपसभापतीपदासाठी भाजपकडून दोघींचे अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. त्यांच्या निवडीवर सोमवारी (दि.9) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, गव्हाणे पहिल्या सभापती होणार असल्याचे ‘दैनिक जनशक्ति’ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज (गुरुवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपकडून गव्हाणे व बाबर यांचे अर्ज भरण्यात आले. प्रत्यक्ष निवडणूक सोमवारी (दि. 9 जुलै) रोजी दुपारी एक वाजता पालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत.