शिक्षण समिती सभापतीपदी प्रा.सोनाली गव्हाणे

0

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रा.सोनाली गव्हाणे यांना मिळाला आहे. शिक्षण समिती सभापतीपदी गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली असून उपसभापतीपदी भाजपच्याच शर्मिला बाबर यांची वर्णी लागली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज (सोमवारी) शिक्षण मंडळ सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी असलेले महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी जाहीर केले.

महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती सोनाली गव्हाणे आणि उपसभापती शर्मिला बाबर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, संजय नेवाळे, नगरसेविका सीमा चौघुले, सुनीता तापकीर, शारदा सोनवणे, रेखा दर्शिले, करुणा चिंचवडे, भीमाबाई फुगे उपस्थित होते. भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची नुकत्याच झालेल्या महासभेत शिक्षण समितीत निवड करण्यात आली होती. यापैकी प्रा. सोनली गव्हाणे यांना पहिला सभापती होण्याचा मान मिळला आहे.