शिक्षा कायद्याने देणे शक्य आहे का?

0

आईवडिलांना वृद्धाश्रमात तेच पाठवतात ज्यांना त्यांची काळजी घेणे शक्य नसते किंवा तशी इच्छाच नसते. स्वतःचेच आईवडील त्यांना भार वाटत असतात. घरातील अडगळ – कटकट वाटत असतात. अशा लोकांनी पगारातले पंधरा टक्के वाचवण्यासाठी आईवडिलांना जवळ ठेवून घेतलं, तरी ते नातं प्रेमाचं असेल का? ज्या पालकांबद्दल प्रेम – माया राहिलेलीच नाही, त्यांची काळजी घेतली जाईल का?

तसंही वृद्धाश्रमात राहणे हा उतरत्या वयातील लोकांसाठी बराच सुरक्षित पर्याय आहे. वृद्धाश्रम जरा बरं असेल तर तिथे शांतपणे राहता तरी येतं. आजूबाजूला समवयीन आणि समदुःखी मंडळी असल्याने, मनातील भाव बोलून दाखवण्याची सोय तरी असते. उतरत्या वयात कुटुंबापासून दूर राहणं कुणालाच आवडत नाही, पण पैशाच्या बदल्यात तिथे किमान काळजी तरी घेतली जाऊ शकते. याउलट जी ज्येष्ठ मंडळी गावाकडच्या वा शहरातल्याच घरात एकट्याने राहतात त्यांचे काय? हक्काने हाक मारायला कुणी नाही. दुखलं-खुपलं बघायला कुणी नाही. सगळ्या जबाबदार्‍या – रोजची कामं थरथरत्या हातांनी स्वतःच पार पाडायची. प्रत्येक वेळी गडी परवडेलच असे नाही, शिवाय अशा गड्यांवर पूर्ण विश्‍वास ठेवणंही शक्य नाही. रोजच्या वृत्तपत्रातून कुरिअर बॉय, वॉचमन किंवा अशाच कुणीतरी एकट्या राहणार्‍या वृद्धांचा गळा घोटल्याच्या बातम्या कमी का असतात? वृद्धांच्या असाहाय्यतेचा फायदा घेणार्‍या अशा घटनांनी जिथे आपण अस्वस्थ होतो, तिथे प्रत्यक्ष एकटेपणा भोगणार्‍यांची काय अवस्था होत असेल? कुठल्या दहशतीखाली वावरत असतील ते? शिवाय दोघांपैकी एकच जण मागे राहिलेला असेल त्यांचे काय? घरात मरून पडलो तरी शेजार्‍याला कळायलासुद्धा आठ दिवस जाण्याची शक्यता. अंधेरीच्या लोखंडवाला कॉप्लेक्समध्ये, दीड वर्षांनी परदेशातून परतलेल्या मुलाला घरात आईचा सांगाडा मिळाल्याची गोष्ट आपण कशी विसरू शकतो? एक वृद्धेचे आयुष्य संपते. तरीही बाहेर कुणाला खबरबात लागत नाही, हे भयावह नाही काय? मरणोत्तर जिची ही अवस्था झाली, तिचे जगणेही किती एकाकी असेल याची आपण कल्पना करू शकत नाही का?

या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आता आपण वृद्धाश्रमांना हीन लेखणं बंद करायला हवं. तुम्ही वृद्धाश्रमांना नाकारलं, तर घराघरांतले वृद्ध असेच कुठेतरी एकाकी पडतील. कुणाला जबरदस्तीने घरात एकत्र राहावं लागलं, तरी ते तिरस्काराचे धनी होतील. एकत्र असूनही एकाकी उरतील. प्रेम करण्यासाठी कुठलाही कायदा जबरदस्ती नाही करू शकत. त्यापेक्षा सरकारने रास्त दरात उत्तम सुविधा देणारी वृद्धाश्रमे स्थापन करण्यावरच भर द्यायला हवा. मुलाबाळांबरोबर, नातवंडांच्या मिठीत राहणं हे कितीही सुखस्वप्नं असलं तरी, तथाकथित आधुनिकतेच्या नादात आपणच आपल्या या अवस्थेला आमंत्रण दिलंय हे मान्य करून नव्या वाटा शोधायला हव्यात. एकाकी वृद्धांची व्यथा ही काही एका दिवसात उभी राहिलेली समस्या नाही. तथाकथित प्रगतीच्या नावाखाली एक पिढी गावातून शहरात येतेय, तर दुसरी देशातून परदेशात चाललीय. शिवाय विकासाच्या आमच्या कल्पनाही अशा उरफाट्या की मुंबईसारख्या शहरात चोवीस तास वीज पाणी, सगळ्या सोयीसुविधा आणि त्याला खेटून रेल्वेने तासभर अंतरावर कर्जत – कसारा – आसनगाव – टिटवाळ्याला सगळीच बोंबाबोंब. वाडा – जव्हार – मोखाडाबद्दल तर बोलायचेसुद्धा नाही. बिचारे पालक पोरांचे भवितव्य सुखकर व्हावे म्हणून त्यांना शहरांचे स्वप्न दाखवतात. मोठी होऊन शहराकडे आलेली पोरं इकडच्या महागाईला शरण जाऊन पालकांनाच नाकारतात. कुणाच्या हातात पैसे असला तरी इथल्या चकचकाटात त्यांचे जुने आईवडील कुठेच बसत नाहीत. आईवडिलांनासुद्धा ही संस्कृती पचवता येत नाही. मुलं परदेशात गेली, तर मग अजूनच कठीण समीकरण होऊन बसतं आणि सुरू होतो एकांताचा एक प्रवास. या प्रवासाला कायद्याने रोखता येणार नाही.

आज आपण जुन्या आणि नव्याच्या मध्यात उभे आहोत. जुनी एकत्र कुटुंबपद्धती जाऊन चौकोनी – त्रिकोणी कुटुंब रुजत आहेत. या नव्या रुजवातीचे नवे प्रश्‍न आहेत. त्यांना नव्या पद्धतीनेच सामोरे जावे लागेल. उगाच मातृ पितृ देवो भवचे दाखले देण्यात अर्थ नाही. पंधरा टक्के पगारात प्रेम आणि मान-सन्मान विकत घेता येणार नाही.

-सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका खारघर, मुंबई
9867298771