शिखर धवनची मानांकनात सर्वोत्तम कामगिरी

0

दुबई । अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी सामन्यात विक्रमी खेळी साकारणारा भारतीय सलामीवीर शिखर धवनने आयसीसी विश्‍वक्रमवारीतील फलंदाजांच्या मानांकन यादीत 24व्या स्थानावर झेप घेताना कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. तसेच मुरली विजय आणि रवींद्र जडेजा या भारतीय खेळाडूंनीही मानांकन यादीत प्रगती केली आहे.

बंगळुरू येथे झालेल्या कसोटी सामन्यत शिखर धवनने 107 धावांची वेगवान खेळी करताना उपाहारापूर्वी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा मान मिळविला. या खेळीच्या जोरावर धवनने 34व्या स्थानावरून थेट 24व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच 105 धावांची खेळी करणार्‍या मुरली विजयनेही 23व्या क्रमांकाची निश्‍चिती केली आहे. याच कसोटीत सहा बळी घेणार्‍या रवींद्र जडेजाने गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला असून ईशांत शर्माने 25व्या, तर उमेश यादव 26व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा हशमतुल्लाह शाहिदी फलंदाजांच्या मानांकनात 111 व्या क्रमांकावर असून कर्णधार असगर स्तानिकझाई 136व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत यामिन अहमदझाई 94व्या, मुजीब उर रेहमान 114व्या, तर रशीद खान 119व्या क्रमांकावर आहेत.