आग विझविण्याच्या प्रयत्नात चारजण जखमी
देहूरोड : शितळानगर क्रमांक 1 येथे घरगुती गॅस सिलींडरचा भडका उडून त्यात दोन कुटुंबातील चारजण जखमी झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण जखमी झालयची माहिती मिळाली आहे. यातील दोघेजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. दोघांवर पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार सुरू असून इतर जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले. इंदू मेकलरी (वय 17), आप्पम्मा मेकलरी (22), यलम्मा मेकलरी (42) आणि अरूण कांबळे (वय 50 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. आणखी दोघेजण किरकोळ जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
आगीमुळे सिलेंडरने घेतला पेट
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मेकलरी यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरला गळती लागल्याचा प्रकार लक्षात आला. दुर्घटना टाळण्यासाठी त्यांनी हा सिलेंडर घराबाहेर आणला. मात्र, येथून पाच सहा फुटावर चुल पेटलेली त्यांच्या लक्षात आले नाही. त्या चुलीच्या आगीची धग पकडून सिलेंडरने पेट घेतला. काही कळायच्या आतच सिलेंडरचा भडका झाला. त्यामुळे स्फोट टाळण्यासाठी ही आग विझवण्याचे प्रयत्न झाले. त्यात वरील चौघे व अन्य दोन जण जखमी झाले. यातील इंदु मेकलरी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून यातील दोघांना पुण्यातील ससून रुग्णालयता पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती रूग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. टी. एम. वाघचौरे यांनी दिली.