तिढा तत्काळ न सोडल्यास तहसीलवर बांगड्या फेको आंदोलन ; मुक्ताईनगरात शिवसेना महिला आघाडीचा इशारा
मुक्ताईनगर- आधार लिंक च्या घोळामुळे तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचित रहावे लागत असून हा तिढा तत्काळ सोडविण्यात यावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयात बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्यांतर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.
आधार लिंक दुसर्याच्याच नावावर
गेल्या काही सात ते आठ महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागाच्या चुकीमुळे तालुक्यातील शिधापत्रिका प्राधान्य धारकांसह कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक होतांना इतर जिल्ह्यातील शिधापत्रिकेस ते लिंक झालेले आहेत तर स्थानिक शिधापत्रिकेला इतर जिल्ह्यातील व दुसर्याच अनोळखी व्यक्तींचे आधार लिंक झाले असल्याने शिधापत्रिका धारकांना ई-पॉज मशीनद्वारे धान्य विकत घेतांना प्रचंड मनस्ताप होत आहे तर याचा गैरफायदा घेत काही दुकानदार सरळ-सरळ लाभार्थींना धान्य नाकारत असल्याने यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात गरीब कुटुंब स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे त्यांचा तर दसरा सण हा वनवासात गेलाच आहे व येत्या 15 दिवसांवर दिवाळीसारखा महत्वाचा सण येवून ठेपला असून या सणालादेखील सदर शिधापत्रिका धारक धान्यापासून वंचित राहू शकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन
मुक्ताईनगर तहसीलदारांनी तत्काळ कारवाई करीत आधार लिंकचा प्रश्न सोडवावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीतर्फे तालुक्यातील शिधापत्रिका धारकांसह तहसील कार्यालयात बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उप शहर संघटक विद्या भालशंकर, उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, नगरसेविका सविता भलभले आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे, मनोहर खैरनार, नगरसेवक संतोष मराठे, शहर संघटक वसंत भलभले, संतोष माळी उपस्थित होते.